– प्रकाश खाडे, जेजुरी

साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही. दिनांक २६ ऑगस्टपासून ५ ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे,” अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. गडावर विविध विकास कामे वेगात सुरू आहेत.

खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकास कामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी-मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, अॅड. पांडुरंग थोरवे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, अॅड. विश्वास पानसे, अभिजीत देवकाते व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…”, मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका

या बैठकीमध्ये पुजारी सेवक आणि ग्रामस्थांनी अनेक सूचना केल्या. मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले. पुजारी सेवक आणि भाविकांची सोय बघूनच विकास कामे केली जात आहेत. खंडोबा गडाचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी विश्वस्त मंडळाने केले.

हेही वाचा : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींचं विधान चर्चेत

खंडोबा गडाला जुने वैभव प्राप्त होणार

दैवत, गडामधील मूळ लिंग असलेले खंडोबाचे मंदिर हे आठव्या शतकातील असल्याचा उल्लेख आहे. तर खंडोबाची उंच दगडी तटबंदी, बाहेरील ओवऱ्या, दीपमाळा यांचे बांधकाम इसवी सन १६३७, १७१२, १७४२ मध्ये मराठा सरदारांनी केले. गडावर पूर्वी ३५० दीपमाळा होत्या, असा उल्लेख आहे. काळाच्या ओघात १४२ दीपमाळा राहिल्या आहेत. अनेक दीपमाळा पडझडीमुळे गेल्या. मात्र आता पुरातत्त्व खात्याने या गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्याने या गडाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. जुन्या ऐतिहासिक स्वरूपात पुन्हा मोठ्या डौलाने खंडोबा गड मराठेशाहीच्या थोर इतिहासाची साक्ष देणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri khandoba temple gabhara closed 26 august to 5 octomber say temple trust ssa