जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरीला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण आटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून सध्या धरणात १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात गाळाचे प्रमाण भरपूर आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, मात्र धरणात काहीच पाणी आले नाही. नळाला आठवड्यातून फक्त दोनच दिवस गाळमिश्रित पाणी येत असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे, पुरंदर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असून दुष्काळाची चिन्हे आहेत. जेजुरीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जेजुरी एमआयडीसीमधून शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसे आदेश दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेजुरीच्या पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी विशेष प्रयत्न केल्याने एमआयडीसीचे पाणी जेजुरीला द्यावे हा मार्ग निघाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामतीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून जेजुरी नगरपालिकेला पाणी देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे पत्र आले आहे. महामंडळाबरोबर पाणीपुरवठा करारनामा करून नळजोड घ्यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने येथे दररोज हजारो भाविक देवदर्शनासाठी येतात, त्यांनाही लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता नव्या निर्णयामुळे एमआयडीसीचे पाणी जेजुरीकरांना मिळणार असल्याने नागरिकांबरोबर भाविकांचाही पाणी प्रश्न काही अंशी सुटणार आहे.

जेजुरीला नाझरे धरण व वीर धरणाच्या जवळील मांडकी डोहातून पाणीपुरवठा होत होता, नाझरे धरणातील पाणीसाठा संपला तर वीर धरणाच्या भिंतीलगत असलेल्या मांडकी डोहातून येणारी पाण्याची पाईपलाईन पुणे- पंढरपूर महामार्ग करताना काढण्यात आली, यामुळे जेजुरी पालिकेला दोन्हीकडून पाण्याची अडचण निर्माण झाली. वीर धरणातून जेजुरी औद्योगिक वसाहतीला रोज पाणीपुरवठा केला जातो, याच पाईपलाईनद्वारे जेजुरीला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पाण्याचे बिल नगरपालिकेला भरावे लागणार

जेजुरी नगरपालिकेने एमआयडीसी कडे एक दिसाड 2000 क्युबिक मीटर पाण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे तत्वता मंजुरी मिळाली आहे .योग्य दर निश्चित करून नगरपालिका हे पाणी बिल भरणार आहे, रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आलेली पाईपलाईन पण जोडण्यात येऊन त्यातूनही शहराला पाणीपुरवठा केला जाईल,पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिका गांभीर्याने उपाय योजना करीत आहे,अशी माहिती मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri municipal council will get water supply from midc
Show comments