जेजुरी वार्ताहर
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान समिती या न्यासावर पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी नुकतीच सात विश्वस्तांची निवड केली आहे.यासाठी सुमारे साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नेमण्यात आलेले सातपैकी पाच विश्वस्त जेजुरी बाहेरील असल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयाच्या विरोधात जेजुरी खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय ग्रामस्थांनी गुरुवारी एकत्र येऊन छत्री मंदिरावर निषेध सभा घेतली.
शुक्रवारी पुणे-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको
शुक्रवारी पुणे -पंढरपूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करून गावातून भव्य मोर्चा काढला. ग्रामस्थांनी खंडोबा गडाच्या पायथ्याशी जाऊन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार केला .नवीन विश्वस्त नेमणुकामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.गुरुवारी झालेल्या ग्रामसभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चुकीच्या विश्वस्त नेमणुकीचा तीव्र निषेध करण्यात आला. जेजुरी बाहेरील व्यक्तींना येथील रूढी परंपरा, यात्रा,जत्रा,उत्सव यांची अजिबात माहिती नसते, त्यामुळे बाहेरील विश्वस्त आम्हाला नकोत अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे,या सभेमध्ये जेजुरी ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याबरोबरच उच्च न्यायालयात कायदेशीर दाद मारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे,माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, जयदीप बारभाई, हेमंत सोनवणे, छगन कुदळे, सचिन पेशवे,विठ्ठल सोनवणे,मंगेश जेजुरीकर, रोहिदास माळवदकर, गणेश आगलावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.बाहेरील विश्वस्तांना विरोध असल्याने ग्रामस्थांनी यांचा सत्कार करू नये करू नये.खंडोबा गडावरील खंडा स्पर्धेच्या वेळी बक्षीसे स्वीकारू नयेत असे ठरवण्यात आले.
खंडोबा गडाच्या पायथ्याजवळ अर्धनग्न आंदोलन
आंदोलनकर्त्यांनी काढलेला मोर्चा खंडोबा गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्या ठिकाणी भंडारा उधळून गणेश गाढवे,प्रवीण आवळे, शेखर रणवरे या कार्यकर्त्यांनी यांनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले शासनाने आम्हाला काडीची किंमत न देता बाहेरचे विश्वस्त आमच्यावर लादले हे आम्हाला मंजूर नाही, याचा निषेध करण्यासाठी अर्ध नग्न आंदोलन करीत आहोत. खंडोबाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जेजुरी गडावर येतात, काही अडचण निर्माण झाल्यास बाहेरील विश्वस्त कधी येणार असा सवाल करून येथील कारभार सुरळीत करण्यासाठी ७० टक्के स्थानिकच विश्वस्त पाहिजेत असे मत त्यांनी मांडले.
पाच विश्वस्तांनी कार्यभाग स्वीकारला
खंडोबा देवस्थानवर करण्यात आलेल्या सात पैकी पाच विश्वस्तांनी गुरुवारी रात्री अकरा वाजता जेजुरी येथील श्री मार्तंड देवस्थानच्या कार्यालयात येऊन कार्यभाग स्वीकारला. संस्थांन चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. यावेळी कार्यालय परिसरामध्ये जेजुरीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने आल्याने विरोध करण्यासाठी आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला .परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली.
खंडोबा गडाच्या विकासासाठी शासनाकडून साडेतीनशे कोटीचा विकास आराखडा
जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी सुमारे ८० ते ९० लाख भाविक येतात.येथे आठ मोठ्या यात्रा भरतात.भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी व प्राचीन खंडोबा गडाचे संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच साडेतीनशे कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या कामांना लवकरच सुरुवात होत आहे. जेजुरीचा खंडोबा सध्या चर्चेत आला आहे.विश्वस्तपदी आपली वर्णी लागावी म्हणून अनेकांनी राजकीय फिल्डिंग लावल्या होत्या. राज्यभरातून आलेल्या शेकडो इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम चार महिने चालले .जेजुरीतील शंभरावर ग्रामस्थांच्या मुलाखती झाल्या होत्या, विश्वस्त कोण होणार याच्या चर्चा जेजुरीत रोज रंगत होत्या. मात्र यादी जाहीर झाली तेव्हा यातील फक्त एकालाच संधी मिळाल्याने संतापाचा उद्रेक झाला, त्याचे आंदोलनात रूपांतर झाले. सर्व जेजुरीकर एक आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सध्या सरकार चालवणाऱ्या शिवसेना-भाजपच्या स्थानिक एकाही कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.