जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे नरेश गोयल यांना काहीसा मिळाला आहे. या कालावधीत ते मुंबईबाहेर जाऊ शकणार नाहीत. नरेश गोयल यांना सप्टेंबरमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
गोयल यांना काही दिवसांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. ३ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी नरेश गोयल यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, ईडीने त्यांना जामीन देण्यास विरोध केला होता. विशेष न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र, रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली होती. यानंतर गोयल यांच्यावतीने उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. यावेळी वैद्यकीय आणि मानवतावादी कारणे सांगून गोयल यांच्यावतीने जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा : ‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…
या सुनावणीचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. यावर नरेश गोयल यांना आज वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. कॅनरा बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. १ सप्टेंबरला ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात असून मध्यंतरी त्यांनी हताश उद्गार केले होते. नरेश गोयल यांनी विशेष न्यायालयासमोर म्हटले होते की, “जीवनाची आशा संपली आहे. सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवले आहे, त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत, अशी हतबल प्रतिक्रिया नरेश गोयल यांनी दिली होती.
दरम्यान, नरेश गोयल यांनी न्यायालयासमोर सांगितले होते की, आपली पत्नी आजारी असून तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. ७४ वर्षीय गोयल यांच्या पत्नी अनीता यांनाही कर्करोगाचे निदान झाले आहे. त्या सध्या उपचार घेत आहेत. दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी नरेश गोयल यांना अटक केल्यानंतर तेव्हापासून ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.