सोलापूर : नादुरुस्त एसटी बसेस, कमालीची अस्वच्छता आणि खराब रस्ते यामुळे सार्वत्रिक नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेल्या करमाळा एसटी बस आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना जागृत ठेवल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. एका महिला प्रवाशाने एसटी बसमध्ये विसरलेली दहा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी संबंधित प्रवाशाला परत केली आहे. त्यामुळे करमाळा एसटी आगाराचे नाव सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चेत आले आहे.
करमाळा एसटी आगारात दुपारी मुंबई-करमाळा एसटी बस आली. त्यावेळी चालकाच्या केबिनमध्ये असलेल्या आसनावर बेवारस स्थितीत पिशवी आढळून आली. ही पिशवी प्रवाशाने विसरून तेथेच सोडली होती. एसटी चालक जितेंद्र भोसले आणि वाहक आत्माराम कुंभार यांनी ही पिशवी न उघडता तशीच वाहतूक नियंत्रक कर्णराज मुसळे यांच्या हवाली केली. पंचनामा करून पिशवी उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली.
दरम्यान, याच मुंबई-करमाळा एसटी बसमधून राशीन (जि. अहिल्यानगर) येथून प्रवास केलेल्या प्रतिभा हनुमंत हेंद्रे (रा. बारामती) ह्या एसटी बसमध्ये हरवलेल्या किंमती ऐवज असलेल्या पिशवीचा शोध घेत होत्या. त्यांनी करमाळा आगारात चौकशी केली असता शेवटी त्यांची पिशवी सापडली. ही पिशवी त्यांचीच असल्याची खात्री पटल्यानंतर हरवलेली पिशवी त्यांच्या हवाली करण्यात आली. तेव्हा प्रतिभा हेंद्रे यांचा जीव भांड्यात पडला. यावेळी आगार प्रमुख वीरेंद्र होनराव यांच्या हस्ते एसटी चालक भोसले आणि वाहक कुंभार यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिभा हेंद्रे यांनीही दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यतत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.