आठ हजार कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड; कुटुंबीयांची उपासमार
नितीन बोंबाडे लोकसत्ता
डहाणू : दागिन्यांमध्ये कलाकुसर करणारे साचे तयार करणारा (डायमेकिंग) व्यवसाय टाळेबंदीच्या काळात ठप्प झाल्याने पालघर जिल्ह्यातील २० ते २५ गावांतील ८ ते १० हजार कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संपूर्ण व्यवसाय बंद पडला असून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्त्रियांचे सोने, चांदीचे अलंकार पेंडल, झुमकी, नथनी, लेडीज अंगठी, जेन्ट्स अंगठी, टॉपस, बांगडी, उलटे फूल, अशा अनेक प्रकारच्या विविध कलाकुसरसाठी साचाची म्हणजेच डायची गरज असते. लखनऊ , दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगलोर, कर्नाटक, गोरखपूर तसेच संपूर्ण भारतातून पालघरमध्ये साचे बनविण्यासाठी कारागीर येतात. बांगलादेश, दुबई, इजिप्त, नेपाळ, पाकिस्तान आदी ठिकाणी कलात्मक सोन्याच्या दागिन्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी असते. पालघर जिल्ह्य़ात तारापूर, चिंचणी, वरोर, वाढवण, बहाड, वासगाव, तडीयाले, गुंगवाडा, डहाणूखाडी, धूमकेत, माडगाव, ओसार, चंडीगाव, तनाशी या गावांत हजारो कारागीर साचे तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत.
लोखंडावर साचा कोरण्यासाठी कार्बन स्टीलचा उपयोग केला जातो. या साच्याला देशात आणि बाहेर देशातही खूप मोठी मागणी आहे. पार्सल जाणे बंद म्हणून बेकारीत वाढ होत आहे. सोन्याची दुकाने चालली तरच डायमेकिंग व्यवसाय टिकू शकतो. ज्वेलरी व्यवसायावर मंदी कोसळल्याने त्याचा फटका डाय व्यवसायाला बसला आहे. मागणी प्रमाणे डाई तयार झाल्यावर त्या कु रिअर तसेच पोस्टाने ऑर्डर देणाऱ्याकडे पाठविल्या जातात.
टाळेबंदीमुळे संपूर्ण व्यवसाय बंद पडला असून आता उपासमारीची वेळ आली आहे. कारागीर एमआयडीसीमध्ये कामाच्या मार्गावर जात आहेत.डाईसाठी लागणारा कच्चा माल कमी दरात उपलब्ध करून देणे, वीज कमी दरात उपलब्ध करून सुरळीत सुरू ठेवावी, अशी मागणी आहे.
— सागर कडू, डाई कारागीर वाढवण
डायमेकिंग व्यवसायाला विशेष दर्जा देऊन त्यास विशेष सवलती व आर्थिक मदत दिल्यास हा व्यवसाय पुनरुज्जीवित करणे शक्य आहे. कठीण काळातही १०० वर्षे जुन्या, १५,००० लोकांना रोजगार देणाऱ्या आणि पालघर जिल्ह्याची वेगळी ओळख असलेल्या या व्यवसायास नवसंजीवनी देता येईल.
– प्रा. डॉ. सुचिता विकास करवीर,
उपप्राचार्य, पी. एल. श्रॉफ महाविद्यलय, चिंचणी