लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणणार असल्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे. मात्र ती वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं पत्र आपल्याकडे असल्याचा असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “लंडनच्या संग्रहालयातील वाघनखं शिवरायांचीच असण्याविषयी संभ्रम”, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचा मोठा दावा

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“वाघनखं ही शिवाजी महाराजांची नाही, हे आम्ही पूर्वीपासून सांगतो होतो. मात्र, राज्य सरकार अट्टहासाला पोहोचलं होतं. आम्ही ही वाघनखे महाष्ट्रात आणली हे सरकारला दाखवायचं होतं. शिंदे सरकारने ही वाघनखे महाराष्ट्रात आणून सोन्याच्या ताटात ठेवली असती, गावा-गावात त्याची पुजा केली असती, त्यातून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती केली असती”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“भाजपाला लोकांना वेड्यात काढायचं आहे”

“भाजपाने कायम मतांसाठी शिवाजी महाराजांचा वापर केला आहे. शिवस्मारकाचं काय झालं? पंतप्रधानांनी नद्यांचं पाणी आणून त्याचं जलपूजन केलं होतं. या स्मारकासाठी आतापर्यंत ३ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. अजून एक इंच स्मारक उभं राहिलेलं नाही. मुळात भाजपाला केवळ लोकांना वेड्यात काढायचं आहे. वाघनखं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे”, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी”

पुढे बोलताना, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या भावनेचा विषय आहेत. खरं तर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागायला हवी, त्यांची चुकी झाली, हे त्यांनी मान्य करायला हवं”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा- “तुमची चार माकडं…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांच्या मंत्र्यांवर हल्लाबोल; थेट नामोल्लेख करत म्हणाले…

इंद्रजीत सावंतांनी नेमका काय म्हटलं होतं?

इंद्रजीत सावंतांनी आज पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भूमिका मांडली होती. “व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगतं आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर तुम्ही जिथे ती प्रदर्शित कराल, तिथे ‘ही वाघनखं शिवरायांची नाहीत, त्याच्या सत्यतेविषयी खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा पद्धतीचं पत्रंही तिथे प्रदर्शित करा, असंही संग्रहालयाने अधिकाऱ्यांना आणि प्रस्तुत मंत्र्यांना सांगितलं. असं असतानाही राज्यातील मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती त्यांचीच आहे असं सांगत त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत.”, असं इंद्रजीत सावंत म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jintendra awhad criticized shinde group bjp government over tiger clow issue spb
Show comments