शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधींचे वडील हे करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत. त्यांचं पालनपोषणही मुस्लीम जमीनदारानेच केलं, अशा अर्थाचं विधान संभाजी भिडेंनी केलं. भिडेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गदारोळ झाला. राज्य सरकारने संभाजी भिडेंची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण संभाजी भिडे यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवलीच नाही, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पुरावाच सादर केला. संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरून शेअर केला.

हेही वाचा- मंचावर शरद पवारांशी हातमिळवणी न करता निघून का गेलात? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, सरकार म्हणतंय, मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडीओ बघा. हे पुरावे आहेत. गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते. सरकार किती खोटं बोलणार? असा सवालही आव्हाडांनी विचारला.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अजित पवारांची मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया, म्हणाले…

खरं तर, सध्या महाराष्ट्र विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षेबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मनोहर कुलकर्णीला पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांना संरक्षण असेल तर ते संरक्षण काढून घेणार का? महापुरुषांचा अवमान करून स्वत: संरक्षणात राहायचं, हे योग्य नाही, आपण त्यावर काय निर्णय घेणार? असा सवाल जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला.

हेही वाचा- “तू कार्यक्रमाला ये, दोन मिनिटं बोल आणि निघ”, अमित ठाकरेंनी राज ठाकरेंनाच दिला सल्ला, नेमकं प्रकरण काय?

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडेंना अशी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. जयंत पाटलांची माहिती चुकीची आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत थेट पुरावाच सादर केला आहे. या व्हिडीओंमध्ये संभाजी भिडे हे पोलीस सुरक्षा व्यवस्थेत वावरताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awahad shared videos sambhaji bhide security vehicle devendra fadnavis rmm