राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी वापरला जणारा निधी रोखला होता. छगन भुजबळ आणि आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित हे देखील माझा हा आरोप मान्य करतील. असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी आज बारामती येथे एक सभा घेतली. या सभेला संबोधित करताना अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले, “आगामी निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, त्याला बारामतीकरांनी योग्य उत्तर द्यावं.” तसेच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली. ते म्हणाले, “मला पक्षाचा अध्यक्ष होण्यापासून वंचित ठेवलं होतं.” यावर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राज्यातील ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शपथ घेऊन सांगावं की, अजित पवारांनी ओबीसींचा निधी थांबवला नव्हता का? आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित यांना विचारा किंवा छगन भुजबळांना विचारा, अजित पवारांनी निधी थांबवला नव्हता का? एससी (अनुसूचित जाती), एसटी (अनुसूचित जमाती) आणि ओबीसी (इतर मागासवर्ग) या तिन्ही विभागांसाठी असलेला निधी थांबवण्याचं काम कायम अर्थ आणि नियोजन मंत्री असलेल्या अजित पवारांनी केलं. तेच आता आमच्यावर टीका करतात.

हे ही वाचा >> “संसदेत भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये जाऊन…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

महाराष्ट्रात जातीयवाद पाळणारा कोणी मंत्री असेल तर तो म्हणजे अजित पवार असा आरोप करत जितेंद्र आव्हाड अजित पवारांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही काय ते वंश..वंश.. लावून ठेवलंय. आज तुम्हाला जे काही मिळालं आहे ते केवळ वंशापोटी मिळालं आहे. मुळात तुमचं कर्तृत्व काय आहे? शरद पवार नसते तर आज तुम्ही कुठे असता? आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्ही मेहनत केली आणि शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद दिले, म्हणून आम्ही इथे आहोत. आम्ही रस्त्यावर आंदोलनं केली. आम्ही रस्त्यावरची पोरं होतो, रस्त्यावर लढायचो, मारामाऱ्या करायचो, पोस्टर फाडायचो, पोस्टर लावायचो, पेपर जाळायचो. शरद पवारांविरोधात कोणीही बोललं, अगदी मुख्यमंत्रीदेखील बोलले तरी त्यांच्या अंगावर जायची ताकद ठेवायचो. पण तुम्ही काय केलंय.” जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दावा केला की, अजित पवार यांच्यामुळे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले.