अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभा दावा निर्माण झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आहेत. अशात जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अजित पवार यांच्यावर आता त्यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

कळव्यातील एका मैदानाला महसूल विभागाने कुलुप लावलं. याबाबत आव्हाड म्हणाले, “मागची दहा ते बारा वर्षे आम्ही कचरा वगैरे साफ करुन, सगळी स्वच्छता ठेवून या ठिकाणी मैदान तयार केलं. मी कधीच इथे येत नाही. काम झाल्यानंतर मी हे मैदान वापरलायला दिलं. कारण या मैदानावर चांगल्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. या मैदानावर चांगल्या खेळाडूंचा सराव सुरु असतो. सगळ्या खेळाडूंना मोफत सराव करता येतो. यामध्ये आत्तापर्यंत राजकीय हस्तक्षेप नव्हता. पण अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि या मैदानाला कुलूप लावायला सांगितलं. मैदान उघडं ठेवायचं नाही असं त्यांनी बजावलं त्यामुळे या मैदानाला टाळं ठोकण्यात आलं.” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

७२ एकर जमिनीचं काय?

आव्हाड पुढे म्हणाले, “बाजूला ७२ एकर जमीन आहे. त्या ठिकाणी टाळं लावा, ती जमीन लुटली जाते आहे, ओरबाडली जाते आहे. तुम्ही नेहमी सांगता मी विकासाचे राजकारण करतो. मग या पोरांचा विकास नको आहे का? इथे एमसीए सिलेक्शन होते. हे सुरू असताना यांनी पैठणकर नावाच्या अधिकाऱ्याला सांगून टाळे लावले. इथे समस्त कळवेकर खेळायला येतात. ज्या मैदानाला लॉक लावायचे त्याला लावा. तुम्ही नशीबवान आहात शरद पवारांनी तुमच्या इथे स्टेडियम बांधले. अजित पवारांनी हे धंदे बंद करावेत, तुम्ही आणि तुमचा जो कोणी उमेदवार असेल तो यांच्या मनातून उतरला आहे. मी आमदार आहे, मला पाडायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून पुढे जाऊ शकता, असे काम करू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “त्यांच्या कानाला कोण दोघं लागायचे हे…”, अजित पवारांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!

श्रीकांत शिंदेंना पाडण्यासाठी…

मैदानाच्या या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तसंच मला म्हणजेच जितेंद्र आव्हाडला पाडायचे म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही. काम करू द्यायचे नाही. माझ्या फायली अडकवल्या जातात. यावरून कळत आहे की, राजकारणाची पातळी किती खालावली आहे. अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांना पाडायचे काम करत आहेत. कल्याणमध्ये येऊन म्हणायचं ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे. तुमच्या पुण्यात शरद मोहोळची हत्या होते. हे करून तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत का आणत आहात? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे.