Jitendra Awhad : ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी (नोव्हेंबर २०२०) हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुख्य आरोपी ओसामा शेख याला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली. मात्र, साडेतीन वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण उकरून काढलं आहे. या प्रकरणातील मुख्य आका कोण? यांचं नावच जाहीर केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मंत्रिमंडळात बसलेले सर्व मंत्री या हत्येला जबाबदार आहेत. एक नाही अनेक आकांचे आका मंत्रिमंडळात बसले आहेत. त्या आरोपीला पकडायला जाणाऱ्या पोलिसाचीच बदली केली होती. आणि त्या गुन्हेगाराची एवढी हिंमत की त्या बदलीचं स्टेटस व्हॉट्सअॅपवर ठेवलं होतं.”

एफआयआरमध्ये नाव, पण चार्जशीटमध्ये उल्लेखही नाही

या गुन्हेगाराचं नाव जितेंद्र आव्हाडांना विचारलं असता ते म्हणाले, “या गुन्हेगाराचं नाव कुटुंबाने घेतलं आहे. एफआयआरमध्येही ते नाव आहे. पोलिसांनी कितीही लपवलं तरीही एफआयआर रद्द करता येत नाही. एफआयआरमध्ये नाव असताना त्याचं चार्जशीटमध्ये नाव नाही. एफआयआरमध्ये नाव असतानाही चार्जशीटमध्ये त्याचा दोषी किंवा निर्दोष असा पोलिसांनी उल्लेखही केलेला नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? असाच गुन्हा त्याने २०१४ मध्ये केला होता. तरीही पोलिसांनी काही कारवाई केली नाही. त्याचं नाव नजीब मुल्ला.” नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आहेत.

पोलिसांकडे एक्स्ट्रा पेन ड्राईव्ह

ते पुढे म्हणाले, “नजीब मुल्ला पूर्वी आमच्याबरोबर होता. त्याचं नाव आहे एफआयआरमध्ये आहे. ओसामा नावाचा जो गुन्हेगार आहे, ज्याने ही सुपारी घेतली. त्याने तीन पेनड्राईव्ह पोलिसांना दिले होते. पण पोलिसांकडे तीनचे चार पेनड्राईव्ह झाले. म्हणजे पेनड्राईव्हसुद्धा मॅनेज करून पाठवला.”

“या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या इन्स्पेक्टरचं नाव नितीन ठाकरे. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनऊपासून गोरखपूरपर्यंत जाऊन केली होती. गोरखपूरमध्ये त्यांनी जाऊन पहिला आरोपी पकडला होता ज्याने गोळी मारली होती. त्या आरोपीने सुपारी देण्याचं नावही सांगितलं होतं. याबाबत उत्तर प्रदेश सरकारने प्रेस नोटही काढली आहे. त्याच नितीन ठाकरेंची बदली आठ तासांत केली. हिंमत असेल तर त्यांच्याकडे पुन्हा नितीन ठाकरेंकडे प्रकरण द्या”, असं आव्हानही जितेंद्र आव्हाडांनी दिलं.

“निवडणुकीच्या काळात मी हे प्रकरण बाहेर काढू शकत होतो. पण एक लाख मतांनी जिंकल्यानंतर मी हे प्रकरण काढलं. मला त्या कुटुंबानेही भेटण्याचा प्रयत्न केला. पण मी भेटलो नाही कारण, मला यात राजकारण नको होतं. पण मी आता या कुटुंबाची बाजू घेतोय”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad alleged ncp leader najib mulla of jamil shaikh murder sgk