Jitendra Awhad on Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Controversy : महाराष्ट्र केसरी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे एकमेकांविरूद्ध भिडले. या सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचे पाहाया मिळले. या लढतीचा निर्णय अवघ्या ४० सेकंदात झाला आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचं घोषित केले. यानंतर शिवराज राक्षेने पंचांशी हुज्जत घातली व्हिडीओ रिव्ह्यू पाहून निर्णय देण्याची मागणी केली. पण राक्षेच्या मागणीकडे पंचांनी दुर्लक्ष केले. यानंतर शिवराजने पंचांशी बोलताना त्यांची कॉलर धरली इतकेच नाही तर त्यांना लाथदेखील मारली. यानंतर शिवराज राक्षेवर कुस्तीगीर परिषदेने ३ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान या सर्व प्रकराचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी एक पोस्ट केली असून ज्यामध्ये त्यांनी “ही कुस्ती फिक्स होती”, असा खळबळजनक दावा केला आहे. याबरोबरच त्यांनी “एवढं ‘मोहोळ” का उठले? कारण… राजकारण”, असंही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र केसरीची कुस्ती खरंच फिक्स होती?

जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र केसरीची लढत फिक्स होती असं म्हटलं आहे. आव्हाड म्हणालेत की, “काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना झाला अन् आश्चर्यकारक निकाल लागला. या उपांत्य फेरीच्या लढतीचा व्हिडिओ मी खाली टाकला आहे. हा व्हिडिओ कुणीही बघू शकतो. शिवराज राक्षेची पाठ जमिनीला लागलीच नाही; त्याची कूस जमिनीवर लागली. शिवराजची कूस जमिनीला लागल्यावर पृथ्वीराज मोहोळ कुस्ती जिंकला, असे जाहीर करण्यात आले. कूस लागल्यावर प्रतिस्पर्धी जिंकत नसतो, हे सांगण्यासाठी कोणा कुस्तीतज्ज्ञाची गरज नाही. कारण, मातीला पाठ लागली तरच चितपट घोषित केले जाते. ही तर मॅटवरची कुस्ती आहे, त्यामुळे सगळेच स्पष्ट दिसतेय. सध्याच्या टीव्ही कॅमेरांमुळे तर अधिकच स्पष्टता येते. म्हणूनच ही कुस्ती फिक्स होती… मॅच फिक्सिंग होती, हे उभ्या महाराष्ट्राला कळले आहे.”

कुस्तीत राजकारण शिरलंय?

पुढे आव्हाडांनी कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोपही केला आहे, ते म्हणाले की, “कुस्तीत हे कुठलं राजकारण शिरलंय. जे खरोखरच ताकदीचे आणि मेहनतीने पुढे आलेले पैलवान आहेत; त्यांना राजकारण करून मागे ढकलण्याचे काम सिकंदर शेखपासून सुरू झाले आहे. आज मला एका गोष्टीचा प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो, जो प्रकार रागावून, अन्याय झाल्याने शिवराज राक्षेने पंचांसोबत केला. तोच जर सिकंदर शेखने केला असता तर आतापर्यंत सिकंदर शेखच्या अख्ख्या खानदानाची, त्याच्या आई- बहि‍णीची लाज रस्त्यावर निघाली असती. टोलधाडीने त्याला छळ … छळ छळला असता. पण, त्याने शांतपणे अन्याय सहन केला आणि परत अन्यायावर मात करून महाराष्ट्र केसरी किताब जिंकला”

एवढं मोहोळ का उठलंय?

“असो, पण या कुस्तीमध्ये खरा जिंकला तो शिवराज राक्षेच! ठरवून पृथ्वीराज मोहोळ याला जिंकविण्यात आले. अंतिम फेरीतही महेंद्र गायकवाड यानेही पंचांच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करीत मैदान सोडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुधात विरजण कोण घालतंय? एवढं ‘मोहोळ’ का उठले? कारण… राजकारण!”, असंही जितेंद्र आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad alleges political involment in maharashtra kesari 2025 result shivraj rakshe prithviraj mohol controversy rak94