Jitendra Awhad and Sanjay Shirsat at Vidhanbhavan : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. तसंच, सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने-सामनेही येत आहेत. दरम्यान, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संजय शिरसाट आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात विधानभवनाच्या पायऱ्यांवरच धुमश्चक्री झाली. हातात संविधानाची प्रत घेऊन जितेंद्र आव्हाडांनी संजय शिरसाटांना घेरलं होतं.
विधानभवनात नेमकं काय घडलं?
विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड आज हातात संविधानाची प्रत घेऊन आले. तसंच, हीच प्रत त्यांनी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्याही हातात दिली. तिथेच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. त्यांनी संजय शिरसाटांच्या हातीही संविधानाची प्रत दिली. “हे संविधानाला लाथाडणारे लोक आहेत”, असं जितेंद्र आव्हाड संजय शिरसाटांना पाहून म्हणाले. त्यावर संजय शिरसाट म्हणाले, “संविधानाची प्रत दाखवून मुसलमानांचा त्यावर विश्वास नाही असं दाखवायचं आहे का तुम्हाला?” असं संजय शिरसाट म्हणाले. ” तेवढ्यात जितेंद्र आव्हाड यांनी रईस शेख यांच्यात हातात संविधानाची प्रत देऊन हात उंचावला.
“जाणूनबुजून तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?” असाही प्रश्न संजय शिरसाटांनी विचारला. “पेहले इन्सान देखो फिर मुसलमान देखो”, असं आमदार रईस शेख म्हणाले. “तुम्ही संविधानाला धरून आहात ना?” असा प्रश्न संजय शिरसाटांनी विचारताच जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्ही घटनेबरोबरच आहोत, आम्हाला या देशात ठेवा ना, आम्हाला मारण्यासाठी का टपलात तुम्ही? औरंगजेब हा औरंगजेब आहे. तो मुसलमानांचा नातेवाई नाही. औरंगजेबासाठी यांना का त्रास देताय.”
तेवढ्यात संजय शिरसाट म्हणाले की, “औरंगजेबाची कबर काढायला तेच (रईस शेख) आमच्याबरोबर येणार आहेत.” त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही जा.” त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “आम्ही काय काय करू शकतो तुम्हाला माहितेय, आम्ही राम मंदिर बनवून दाखवलं.” अशी शाब्दिक धुमश्चक्री सुरू असताना आजूबाजूला तिन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी घोळका केला होता.