आगामी हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’ च्या प्रदर्शनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आव्हाड म्हणाले, हल्ली आपल्याकडे नवीन पद्धत सुरू झाली आहे. एका ठराविक धर्माबाबत चुकीचं काहीतरी चित्रपटात दाखवायचं, त्याचा गवगवा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार चालला आहे. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम खूप परिणामकारक आहे. चित्रपट मनावर सर्वाधिक परिणाम करतो. चित्रपट पाहून आल्यावर लोकांवर बराच काळ त्याचा प्रभाव राहतो. त्याच माध्यमाचा वापर करून एका समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गरिबांनी चित्रपट पाहिले म्हणून अमिताभ बच्चन सुपरस्टार झाला. त्याने केलेल्या भूमिका पाहून असं वाटायचं की तो आपल्यासाठी भांडतोय. मात्र आता चित्रपट दाखवणाऱ्या लोकांचा द्वेष पसरवण्यासाठी वापर होतोय. ‘केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तीन दिवसात तो चित्रपटगृहांनी काढून टाकला. आता हा (हमारे बारह) चित्रपट आणतायत. या चित्रपटात कुराणचा वपर केला आहे. मात्र कुराणमध्ये लिहिलेल्या गोष्टी मोडून-तोडून सादर केल्या आहेत. कुराण आपल्यासमोर चुकीच्या पद्धतीने मांडलं आहे. चित्रपटात जे दाखवलं जातंय ते खोटं आहे. कारण कुराणमध्ये सांगितलं आहे की, पतीने पत्नीशिवाय कुठेही जायचं नाही.”
शरद पवार गटातील आमदार म्हणाले, “एखाद्या दाम्पत्यामधील संबंध कसे असावेत हे देखील कुराणमध्ये सांगितलं आहे. संभोग कसा करावा हेदेखील त्यात सांगितलं आहे. कोणी किती मुलं-मुली जन्माला घालावी हे त्यात सांगितलेलं नाही. खरंतर मुलांचा विषय सामाजिक आणि आर्थिक गोष्टींशी संबंधित असतो. घरात किती पैसे येतायत ते पाहून लोक मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेतात. आता त्यांनाही (मुस्लिमांना) समजलं आहे. सध्याची परिस्थिती काय आहे, मुलं शिकली नाहीत तर काय होऊ शकतं, शिक्षणाच्या आभावामुळे त्यांच्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्याचं आपण पाहिलं-वाचलं आहे. तरीदेखील तुम्ही लोक एखाद्या समाजाला कोपऱ्यात नेऊन किती मारणार आहात? इतका चुकीचा चित्रपट आणणं, तो लोकांना दाखवणं चुकीचं आहे. महिलांची काही आब्रू नाही का? महिला काय मुलं जन्माला घालणाऱ्या मशीन्स आहेत का? मुस्लीम महिलांनाही महत्त्व द्या, त्यांचा आदर राखा.”
हे ही वाचा >> “निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम यांचं मोठं वक्तव्य
आव्हाड म्हणाले, “या चित्रपटामधून कुराणचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे. सेन्सॉरने त्यावर कुठलाही आक्षेप न घेता प्रदर्शनाला मान्यता कशी दिली? चित्रपटकर्त्यांनी असं काहीतरी बनवण्यापूर्वी कुराण वाचायला हवं, तपासायला हवं. असं काहीतरी केल्यामुळे समाजात वितुष्ट निर्माण होतंय आणि यात देशाचं हित नाही हे काही लोकांच्या लक्षात कसं येत नाही? जनतेलाही समजलं आहे की हे सगळं केवळ राजकीय कारणांसाठी वापरलं जातंय.”
© IE Online Media Services (P) Ltd