गेल्या दीड वर्षापासून राज्यातील जनता करोनामुळे त्रस्त असताना आर्थिक अडचणीमुळे देखील हवालदील झाली आहे. उद्योगधंदे आणि आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे सामान्यांचं आर्थि गणित बिघडलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर केली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या जवळपास ८ हजार २०५ हजार घरांची आज घोषणा केली. या घरांपैकी तब्बल ९७ टक्के घरं ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव असतील, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं आहे.
याआधीची लॉटरी २०१८मध्ये निघाली होती!
म्हाडाच्या इतर ठिकाणच्या सोडतींप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. याआधीची म्हाडाची कोकण मंडळासाठीची सोडत २०१८ मध्ये ९ हजार ०१८ घरांसाठी निघाली होती. आता या महिन्यात ८ हजार २०५ घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं आहे.
गोरगरीबांसाठी घरं देण्याचं स्वप्न!
“या महिन्यात आम्ही ८ हजार २०५ घरांची कोकणात लॉटरी काढणार आहोत. त्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरं आहेत. त्यामुळे एकूण ९७ टक्के घरं ही अल्प आणि अत्यल्प गटासाठी असणार आहेत. गोरगरीबांसाठी घरं द्यायची हे म्हाडाचं स्वप्न कोकणासाठी पूर्ण होणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
कोकण मंडळातील या घरांसाठी दसऱ्यादरम्यान सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असेही त्यांनी सांगितले.
कोकण मंडळाच्या सोडतीची घोषणा याआधीही काही महिन्यांपूर्वी झाली होती. मात्र, काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे ही सोडत रखडली होती. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीत ३०० ते ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा समावेश असेल. या घरांच्या किमती १२ ते ५६ लाख रुपयांदरम्यान असतील.