अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे गेल्या काही महिन्यांपासून बारामतीच्या राजकारणात सक्रीय आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटासाठी मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळाले. त्यांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी आमदार रोहित पवारांबरोबर मतदारसंघ पिंजून काढल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, शरद पवार यांनी आता युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात उभं करण्याची योजना आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी त्यांना युगेंद्र पवारांच्या विधानसभेच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) बारामतीबाबत प्रश्न विचारून माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करत आहात, तुम्ही सर्वांनी मला कायमचं घरी बसवण्याची योजना आखली आहे का? ते शरद पवारांचं घर आहे. त्या घरावर आपण उगाच टकटक का करावं? आपण त्यात पडू नये.

दरम्यान, युगेंद्र पवार यांना बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. यावर स्वतः युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युगेंद्र पवार म्हणाले, मी सुद्धा केवळ चर्चा ऐकतोय, माझ्यापर्यंत याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मलाही काही लोकांनी सांगितलं की परवा कुठेतरी एक बैठक झाली, त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. परंतु, माझ्यापर्यंत कुठलंही अधिकृत पत्र वगैरे आलेलं नाही.

दरम्यान, युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशी चर्चा का सुरू झाली? त्यावर युगेंद्र पवार म्हणाले, त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. ही केवळ चर्चा आहे आणि लोक कशावरही चर्चा करतात. ती चर्चा खरीच असेल असं नाही. ही चर्चा नेमकी का सुरू झाली आहे हे मी सांगू शकणार नाही. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून मी बारामती कुस्तीगीर संघाची जबाबदारी सांभाळत आहे. याआधी श्रीनिवास पवार बारामती कुस्तीगीर परिषदेचे काम पाहत होते. त्यानंतर मी स्वतःहून ही जबाबदारी घेतली. गेल्या तीन वर्षांत आम्ही पैलवानांसाठी खूप कामं केली आहेत. त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आम्हाला या कामात मदत केली आहे. इमारत बांधणे, तिथे पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिलं आहे. संपूर्ण तालुक्यातून तिथे पैलवान येऊ लागले आहेत. आमच्या पैलवानांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदानं गाजवली आहेत.