अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कुणी नेमलं? त्यांना पाठिंबा कुणी दिला? त्याचे काही पुरावे आहेत का? असे प्रश्न आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.
अचानक अजित पवार अध्यक्ष कसे झाले?
२ जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ३ जुलैच्या दिवशी शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत असं म्हटलं होतं. मग अजित पवार हे अध्यक्ष कसे काय झाले? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. ३० जून रोजी अजित पवार गटाने आम्ही बैठक घेतली आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं असं सांगितलं. अशी कुठलीही बैठक झाली नाही. याबाबत विचारलं असता असं कळलं की फोनवरुन बैठक झाली. अशा बैठका कधीही फोनवरुन होत नसतात. अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी कुणी पाठिंबा दिला आहे ते सांगा असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
पत्रकार परिषद खोटं लपवण्यासाठी होती
सोमवारी अजित पवार गटाची पत्रकार परिषद ही आम्ही जे खोटं बोललो तेच कसं खरं होतं हे दाखवण्यासाठी होती असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसंच ३ जुलै रोजी जर अजित पवार म्हणत होते की शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत तर मग अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय झाले? अजित पवार हे अध्यक्ष नाहीत तरीही ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सही कशी करतात? पक्षातल्या ९५ टक्के लोकांनी शरद पवार यांना अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस वेगळी आहे असं अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागचे लेखक, पटकथा, दिग्दर्शक एकच आहेत, फक्त कलाकार बदलले आहेत.