अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नऊ आमदारांसह पक्षाशी बंडखोरी करत भाजपा-शिवसेनाप्रणित महायुतीत प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी तीन दिवसांपूर्वी (२ जुलै) उपमुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (५ जुलै) अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमेकांपुढे शक्तीप्रदर्शन केलं. तसेच आज अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांबरोबर असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांच्यावर कशा प्रकारची जबरदस्ती केली जात होती, हे मला थोडंबहुत माहिती आहे. परंतु मी उघडपणे बोलणार नाही. आजच्या भाषणातून तुम्हाला कळलंच असेल की यांना (अजित पवार) शरद पवारांना हाकलायचंच होतं. हाकलायचं हा शब्द वापरणं थोडं चुकीचं आहे, कारण दोघेही एकाच घरातले आहेत.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांना शरद पवार नकोसे झाले होते. काळ आणि वेळ तुमच्याबरोबर आहे, तुम्ही तरुण आहात, तुमचं वय आहे अजून, त्यामुळे ज्याच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापिटा का करताय? असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर केलेल्या आरोपांना आव्हाड यांनी केवळ एका वाक्यात उत्तर दिलं. जितेंद्र आव्हाड म्हणाले, नारळ कोणावर तरी फोडावा लागतो म्हणून मला दोष दिला जात आहे.
हे ही वाचा >> “शरद पवारांच्या परस्पर काहीजण…”, अजित पवार गटाचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड बंडखोर आमदारांना म्हणाले, तुम्हाला निवडून आणण्यासाठी हा माणूस (शरद पवार) २००४ साली कॅन्सर झालेला असतानाही वणवण फिरला. पाय मोडलेला असताना मतदारसंघांमध्ये फिरला. पुढे काय काय काय केलं हेही मी सांगू शकतो. रणरणत्या उन्हात रक्त आणि लाळ गळत असताना तुमच्यासाठी फिरला की नाही फिरला? विदर्भात फिरला का नाही फिरला? त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? असे अनेक प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी विचारले आहेत.