राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये उभी फूट पडली होती. अजित पवार यांच्यासही काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ( २३ जानेवारी ) साक्ष नोंदवण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाडांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री राम प्राणप्रतिष्ठा दिवशी अजित पवार कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली, असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवार कधीच वरिष्ठांचं ऐकत नाहीत. आमच्यात असताना ते शरद पवारांचं ऐकत नव्हते. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऐकत नाहीत. त्यामुळे अजित पवारांना प्रभू श्री राम महत्वाचे वाटत नाहीत.”

“आशुतोष काळे भारतात नव्हते, तर सही कुठून आली?”

आमदार आशुतोष काळे यांनी निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या पत्रावर सहीवरून जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केला आहे. “मला जुलै महिन्यात शिर्डीला जायचं होतं. यासाठी मी आशुतोष काळेंच्या निकटवर्तीयाला शिर्डीला जाण्याआधी फोन केला. तेव्हा आशुतोष काळे विदेशात असून १२ ते १५ जुलैपर्यंत देशात येणार नाहीत, असं सांगण्यात आलं. पण, निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आलेल्या पत्रात आशुतोष काळेंची सही होती. ही सहीच खोटी आहे. कारण, आशुतोष काळे भारतात नव्हते, तर सही कुठून आली?” असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला.

“१ जुलैला शिंदे-फडणवीसांवर अजित पवारांची टीका अन्…”

“१ जुलै २०२३ ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ३ जुलैला शरद पवार आमचे नेते असून तेच अध्यक्ष आहेत, असं सांगण्यात आलं. ५ जुलैला झालेल्या सभेत शरद पवारांचा दहा फुटी फोटो अजित पवार गटाकडून लावण्यात आला होता,” असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad attacks ajit pawar over sharad pawar narendra modi shri ram ssa