बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणब्यांविषयी अतिशय घाणेरडे लिहिलं होतं. तेव्हा, पुरंदरेंना विरोध केल्यामुळे सुनील तटकरेंनी मला दम दिला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “‘मी शुद्र असल्यानं माझ्यावर टीका केली जाते,’ असं विधान सुनील तटकरेंनी केलं होतं. पण, राज्यातील राजकीय कुटुंबांना जी पदे मिळाली नाहीत, ती तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली. जयंत पाटील, मिनाक्षी पाटील हे शरद पवारांना वडिलांसारखे मानत असल्यानं आदिती तटकरेंना जिल्हापरिषद अध्यक्ष केलं.”

हेही वाचा : “अजित पवार यांच्या वयावर बोलण्यापेक्षा…”, सुनील तटकरेंनी दीपक केसरकरांना सुनावलं

“मला मागे ठेवत आदिती तटकरेंना पालकमंत्री केलं”

“जेव्हा अडचणी उभ्या राहिल्या, तेव्हा शरद पवारांनी शेकापशी चर्चा केली आणि तुमच्या विजयाचे मार्ग सुकर केले. तुम्हाला मंत्री, खासदार केलं. भावाला आणि मुलाला आमदार केलं. असं कुठलं पद तुम्हाला द्यायचं राहिलं होतं? मला मागे ठेवत आदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्री केलं. मग, मीही शुद्र होतोच,” असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “मी शुद्र असल्यामुळेच सुप्रिया सुळेंकडून लक्ष्य केले जाते”, सुनील तटकरे असे का म्हणाले….

“तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात बोलला नाही”

“बाबासाहेब पुरंदरेंनी कुणब्यांविषयी अतिशय घाणेरडे लिहिलं होतं. ‘चार आण्याला पाच कुणबी मिळत असे’ या बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाविरोधात मी लढत होतो. तेव्हा तुम्ही मला दम दिला. ‘पक्षात असं चालणार नाही. बाबासाहेब पुरंदरेंची माफी मागा’ असं तुम्ही मला म्हटलं. मी तेव्हाच सांगितलं होतं की, माझा अभ्यास असल्यानं मागे हटणार नाही. मात्र, तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात बोलला नाही,” असा प्रश्नही जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad attacks sunil tatkare ovar babasaheb purandare ssa