राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेत आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आव्हाड यांनी आज त्याची पुनरावृत्ती केली.
मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला. आव्हाड म्हणाले, “हे सरकार आज केवळ दोन श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार करतंय. मात्र हळूहळू संपूर्ण मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण आत्ताच सावथ असलं पाहिजे.” आव्हाड यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली. “अजित पवार स्वतःला पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणवतात, मग त्यांनी आता राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे का?” असा प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.
जे दोन श्लोक राज्य सरकार अभ्यासक्रमात समाविष्ट करु पाहतंय ते दोन्ही श्लोक आव्हाड यांनी यावेळी वाचून दाखवले. तसेच मनुस्मृतीमधील इतरही काही आक्षेपार्ह श्लोक वाचून दाखवले आणि त्यांचा अर्थ सांगितला. त्यानंतर आव्हाड म्हणाले, मनुस्मृतीत क्षुद्र आणि स्त्रियांबाबत खूप घाणेरडं लिखाण केलेलं आहे. स्त्रिया मानवजातीत मोडत नाहीत असं मनूचं म्हणणं आहे. स्त्रिया या केवळ उपभोग घेण्यासाठी असतात असं मनू मानतो. त्यामुळे स्त्रियांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असंही मनू सांगतो. मनुस्मृतीमधील दोन श्लोक अभ्यासक्रमात घेतले तर हळूहळू संपूर्ण ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो.
हे ही वाचा >> “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!
जितेंद्र आव्हाड म्हणाले, काही निवडक लोक आपल्या महाराष्ट्राला बदनाम करू पाहतायत. आपल्या राज्याला पुन्हा ४ ते ५ हजार वर्षे मागे नेण्याचं काम करतायत. देशातलं सरकार आपलं संविधान बदलण्याचं काम करतंय, समाजांमध्ये तेढ निर्माण केली जातेय, राजकीय फायद्यांसाठी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आपल्यासमोर आणि आपल्या देशाची चिंता असलेल्या लोकांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे.