राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या विधानावर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्वीटद्वारे त्यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल काय स्पष्टीकरण दिले?
आव्हाड यांच्या विधानावर आक्षेप घेण्यात येत असल्यामुळे त्यांनी एका ट्वीटद्वारे त्यांच्या स्पष्टीकरण दिले आहे. त्यासाठी त्यांनी पुण्यातील आपल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच विधानाचा कसा विपर्यास केला गेला, याबाबत त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच बहुजन इतिहास डोळ्यात का सलतो? असा थेट सवालही आव्हाड यांनी केला असून ‘करारा जवाब मिलेगा’ असेही ते म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
याआधी जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात बोलताना एक विधान केले होते. याच विधानावर आक्षेप घेत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. १६६९ साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर नागपूर, पुण्यात निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या काही नेत्यांनी आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत टीका केली आहे.