भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणाबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत राहिलं. गडकरींनी “मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं”, अशी उद्विग्न भावना व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी म्हणत आहेत ते खरं असल्याचं आव्हाडांनी म्हटलं. तसेच राजकारण फक्त सत्तेसाठी करायचं नसतं, असंही नमूद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राजकारण फक्त सत्तेसाठी करायचं नसतं. नितीन गडकरींनी रविवारी (२४ जुलै) त्यांच्या भाषणात राजकारण्यांचा व राजकारणाचा कंटाळा यायला लागला. ते म्हणाले आता फक्त सत्ताकारणाचं राजकारण होतं. ते म्हणाले ते बरोबर आहे. सत्ता हा लोकशाही, कल्याणकारी राज्याचा मार्ग दाखवतं. त्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे. सत्ता सत्तेसाठी नसावी.”

“गोरगरीब शोषितांच्या मदतीला धावून जाणे हाच राजकारणाचा खरा अर्थ”

“आपले हात गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी जातात, मदत हवी तिथे आपला हात आधारासाठी जातो. गोरगरीब शोषितांच्या मदतीला आपण धावून जातो. हाच राजकारणाचा खरा अर्थ आहे. सत्ता दुय्यम आहे. मनात मदतीची भावना असावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात ती भावना आहे. ठाण्यात आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी आम्ही अशी शिबिरं आयोजित केली. कुठल्या भागातून कुणाला कुठली मतं मिळतात हा प्रश्न गौण आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

“कुठलाही भाग असो तेथील नागरिकांना मदत झाली पाहिजे. शाळेचा किंवा कॉलेजचा प्रश्न असतो, दाखल्याचा, उत्पनाच्या दाखल्याचा प्रश्न असतो. तहसीलदार कार्यालयात नागरिकांचे दोन दोन तास वाया जातात. त्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका ठिकाणी मिळाली, तर नागरिकांना काही तासात दाखले मिळतात. ही चांगली जनसेवा असल्याचे मला वाटते,” असंही आव्हाडांनी नमूद केलं.

नितीन गडकरी काय म्हणाले होते?

नितीन गडकरी म्हणाले होते, “राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे.”

हेही वाचा : “बाप दाखवा नाही, तर श्राद्ध करा”; नितीन गडकरींचा अमरावतीत पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा

“मला खूप वेळा राजकारण सोडावंसं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत,” अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन समृद्ध व्हावं, त्यात दर्जात्मक बदल व्हावेत यासाठी व्यक्ती आणि नेतृत्वात गुणात्मक बदल झाला पाहिजे. गुणात्मक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. विचारांमधून, थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं आपल्या संस्कृतीत लिहिलेलं नाही.”

हेही वाचा : नितीन गडकरी राजकारण सोडणार? नागपुरातील विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “आजचं राजकारण १०० टक्के….”

“माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad comment on nitin gadkari statement on politics pbs