माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पोलीस कारवाईवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “ठाण्यात सरकार एकाच घरातील तीन तीन लोकांवर मोक्का लावत आहे,” असा गंभीर आरोप केला. तसेच मुंब्र्यात मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, असंही नमूद केलं. ते बुधवारी (२३ नोव्हेंबर) ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार एकाच घरातील तीन तीन लोकांवर मोक्का लावत आहे. ठाण्यात ते काय-काय करत आहे. अशी स्थिती असेल तर बिचारे पोलीस अधिकारी काय करतील. एवढीच अपेक्षा असते की, पोलीस अधिकारी आयपीएस म्हणून जी शपथ घेऊन आलेले असतात त्या शपथेप्रमाणे अधिकाऱ्यांनी उभे रहावे.”
“…तर कुठलंच सरकार काहीही करू शकत नाही”
“अधिकारी आपल्या शपथेसाठी उभे राहिले तर कुठलंच सरकार काहीही करू शकत नाही. मात्र, त्यांनी उभं राहायला हवं. हे खोटं आहे, हे काम करणार नाही, असं म्हटलं पाहिजे. सरकार यावर जास्तीत जास्त काय करू शकतं, तर बदली करेल. पोलीस कधीच ठाम भूमिका घेत नाहीत,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“मला पोलीस अधिकाऱ्यांची अस्वस्थता दिसत होती”
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “माझ्यावर दोन्ही गुन्हे दाखल करताना मला पोलीस अधिकाऱ्यांची अस्वस्थता दिसत होती. मात्र, मुंब्रा येथील ३५४ चा गुन्हा तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही.”
“तो डाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही”
“बाकी इतर काय गुन्हे दाखल करायचे आणि तुरुंगात टाकायचं ते टाका. मात्र, मुंब्र्यात एका मुस्लीम महिलेला पुढे करून मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही,” असंही आव्हाडांनी नमूद केलं.