२०१४ पासून महाराष्ट्रात आणि देशात विरोधक कमी पडले आहेत. तसंच जे सत्तेत आहेत त्यांनी समाजमाध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.

सत्तेच्या चक्रात आपण अडकलो आहोत

सत्तेच्या चक्रात आपण इतके अडकलो आहोत की आपण आपली मूळ भूमिकाच विसरलो आहोत. कालपर्यंत फुले-शाहू, आंबेडकरांचा विचार मांडणारा माणूस अचानक गोळवलकरांच्या मांडीवर जाऊन बसतो ते कळतच नाही. जे काही रातोरात होतं त्याचं मला काही कळतच नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

सत्तेच्या लालसेपोटीच या गोष्टी होतात

मनपरिवर्तन वगैरे काही होत नाही. सत्तेच्या लालसेपोटीच या गोष्टी होतात. ३० वर्षे ज्या पक्षाची विचारधारा आपण मान्य केली ती एका रात्रीत कशी काय बदलते? तसं करताना लाज वाटली पाहिजे ना? मी जेव्हा उद्या एखाद्या पक्षात जायचं ठरवेन माझ्या पोस्ट आहेत, माझं पुस्तक आहे, लोक थुंकतील ना माझ्यावर. जर ते थुंकले तरीही मी रुमालाने पुसेन आणि सत्तेवर बसेन असं म्हटलं तर मग काही बोलायलाच नको. माणसाला स्वतःची स्वतः एक मर्यादा असली पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकात उल्लेख

यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की मी जेव्हा हेडगेवारांना भेटलो तेव्हा मला कळलं की एका विशिष्ट हेतूने एका विशिष्ट समाजासाठी यांचं राजकारण आहे. यांचं राजकारण सर्वसमावेशक नाही. त्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला गेलो नाही. हे यशवंतराव चव्हाण यांचे शब्द आहेत.

सह्यांच्या पत्राबाबत काय घडलं ते सांगतोच

“एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या. आमच्यातले काहीजण आधीच अस्वस्थ होते, सत्तेत जायचं आहे हे सांगायचे. दोन चार लोक असे होते की जे रोज शरद पवारांकडे जायचे आणि सांगायचे की आपण भाजपासह जाऊ. एक वेळ अशी आली की काही लोक म्हणू लागले शरद पवारांना एकटं राहू द्या आपण भाजपाबरोबर जाऊ. हे सुरु असताना एक माणूस ढसाढसा रडला. त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील. मग त्यांनी सांगितलं की आपण एक पत्र लिहू ते शरद पवार यांना दाखवू. त्यावेळी काही टपलेले लोक म्हणाले की जितेंद्रला विचारा, तेव्हा मी म्हटलं हो सही करायला तयार आहे जर शरद पवारांनी सांगितलं तर तो निर्णय मान्य. अजित पवारांनी निर्माण केलेला दरारा आणि दहशत याचा त्यावेळी मी बळी ठरलो. ” असं आव्हाड म्हणाले.

“अजित पवारांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं मला त्या काळात. पण आज महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटील यांनी आपल्या खिशात ठेवून घरी नेलं त्यांनी आयुष्यात ते पत्र शरद पवारांपर्यंत पोहचवलंच नाही. शरद पवारांना एकटं सोडून आपण भाजपाबरोबर जाणं हे मला पटत नाही असं ते मला म्हणाले. तसंच पत्र देत नाही असंही म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हटलं सर्वात आधी काय कराल तर माझं नाव त्यातून काढा. त्यावेळी अजून एक माणूस होता ज्याचं नाव होतं प्राजक्त तनपुरे. त्यानेही मला सांगितलं जमणार नाही मी त्याला सांगितलं की तू जा. त्यावेळीही अशी माणसंही होती ज्यांना भाजपासह जायचं नाही. मी पण त्यावेळी त्या विचारांशी समझोता करायचा नाही हा निर्णय घेऊनच बसलो होतो.” असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.