Jitendra Awhad : आज लोकसभेत बोलताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्यांची जात कोणाला माहिती नाही, ते आज जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करत आहे, असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष केलं. दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून अनुराग ठाकूर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “संसदेत अत्यंत उर्मटपणे विरोधी पक्षनेत्याला त्याची जात विचारली जाते, याहून मोठा संसदेचा आणि संविधानाचा अवमान काय?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच “भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेत जातीचा हा क्रूर अपमान झाला असावा”, असेही ते म्हणाले.
“…म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे”
पुढे बोलताना, “दिल्लीत उघडपणे हिंदू-मुस्लीम दंगल घडवण्याचा आरोप असलेले भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा त्यांची आणि भाजपाची बहुजनविरोधी भूमिका संसदेत मांडली आहे. जातिनिहाय जनगणना होऊच नये आणि बहुजनांना त्यांचे हक्क मिळूच नये यासाठी हा सगळा खेळ चालू आहे”, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. “ज्या दलित, आदिवासी व मागासवर्गीयांमुळे भाजपाला २४० जागा घेऊन गप्प बसावं लागलं, त्यांची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
अनुराग ठाकूर नेमकं काय म्हणाले?
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अनुराग ठाकूर यांनी आतापर्यंतचे काँग्रेसचे पंतप्रधान आणि त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचली. त्यानंतर आता मला सांगा हलवा कोणाला मिळाला? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना विचारला. पुढे बोलताना, काही लोक ओबीसींबद्दल केवळ बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन आहे. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे.” अशी टीकाही अनुराग ठाकूर यांनी केली.
राहुल गांधींचही अनुराग ठाकूर यांना प्रत्युत्तर
अनुराग ठाकूर यांच्या टीकेला राहुल गांधी यांनीही प्रत्युत्तर दिले. “अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली. माझा अपमान केला. परंतु, मला त्यांच्याकडून माफी नको. जो कोण या सभागृहात दलितांचे मुद्दे मांडतो, त्याला शिवीगाळ ऐकावी लागते. मी या शिव्या आनंदाने स्वीकारेन. महाभारतातलं उदाहरण द्यायचं झाल्यास अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसत होता. आता आमचंही एकाच गोष्टीवर लक्ष आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमची मागणी असून आम्ही सरकारला ही जनगणना करायला लावणारच. त्यासाठी मला कितीही शिवीगाळ सहन करावी लागली तरी चालेल. अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली आहे, परंतु, मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही.” असे राहुल गांधी म्हणाले.