उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे १ जुलैपासून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. मात्र, आता हे अर्ज भरण्यासाठी महिलांकडून १०० रुपये घेतले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतील दोन नियम बदलले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली घोषणा

जितेंद्र आव्हाड यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी १०० रुपये घेतले जात असल्याच्या आरोपाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, बहिणीकडून १०० रुपये घेताना सरकारला लाज वाटत नाही का? अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

हे होणारच होतं. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये घेतले जात आहेत. लाडक्या बहिणींकडून १०० रुपये घ्यायला राज्य सरकारला लाजही वाटत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – “लाडकी बहीण योजना म्हणजे माहेरचा आहेर”; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “या योजनेचा लाभ…”

अजित पवारांनी जाहीर केली होती घोषणा

दरम्यान, अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. “महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल.” अशी माहिती अजित पवारांनी दिली होती.