Jitendra Awhad Critisis Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर अजित पवारांनी अनेकदा अनेक गोष्टींची कबुली दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती इथपासून कुटुंबातील फूट समाजात स्वीकारला जात नाही, याचा अनुभव मीही घेतलाय इथपर्यंत अजित पवारांची वक्तव्ये कायम चर्चेत राहिली. त्यांच्या या वक्तव्यावरच शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा”, असं आज अजित पवार म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवार बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रामवस्थेत नेणं ही एक कला आहे. या कलेचा ते वापर करत आहेत. बारामती त्यांच्यामुळे उभी राहिली हे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. बारामती उभी राहिली ती पवारांमुळे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा >> Ajit Pawar on Baramati Elections: “मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

अजित पवारांनी पत्रकारांना सांगावं की…

“अजित पवारांनी पक्ष हिसकावून घेतला. राजकीय करामती केल्यात. एवढा पश्चाताप घर फोडण्याचा होत असेल तर जाऊन एकदा पत्रकारांना सांगा हा पक्ष मी शरद पवारांच्या घरातून चोरून आणला आहे, आणि मी आता त्यांना देऊन टाकतो. मी माझी निशाणी घेऊन लढतो”, असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलं.

हेही वाचा > Ajit Pawar : “कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, मलाही याचा अनुभव”, अजित पवारांची कबुली!

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्याविरोधात ब्र सुद्धा काढायचा नाही. तो त्यांना घाबरून नाही. ही तक्रार पवारांपर्यंत गेली तर पवार नाराज होतील, या भीतीने. आता तसं नाहीय. आता तिथे ना पवार साहेब आहेत आणि कोणी कोणाला घाबरत नाही”, असंही ते म्हणाले. “वेळोवेळीच्या मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांनी केलेला जाहीर अपमान आम्ही सर्वांनी पाहिला आहे. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा त्यांनी अपमान केलाय. सहकाऱ्यांना तुच्छ पणाची वागणूक मिळायची. पवारांमुळे कोणीही बोललं नाही. के सी पाडवींना तर इतकं घालून पाडून बोलायचे, ते कॅबिनेट मंत्री आहेत, आदिवासी असले म्हणून काय झालं?” असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad critisis ajit pawar over confession of family dispute sgk