वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नीट-पीजी २०२४ परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, ‘नीट-यूजी’च्या परीक्षेवरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान देत ‘‘नीट-यूजी’च्या परीक्षेवरून केंद्रातील मंत्र्यांना प्रश्न विचारावे. तसेच हिंमत असेल तर अजित पवारांनीही राजीनामा द्यावा’, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“नीट-यूजी परीक्षेचा घोटाळा हा या देशाला लाज आणणारा घोटाळा आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांच्या भावना असतात. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात किंवा गरीब घरातील जे विद्यार्थी असतात त्यांना दोन पर्याय माहित असतात. त्यामध्ये नीटची परीक्षा द्यायची, डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनिअर व्हायचं. महाराष्ट्र सरकारच्या हातात असलेल्या या परीक्षा या व्यवस्थित घेतल्या जात होत्या. अर्थात गेल्या चार वर्षातील यासंदर्भातील अनुभवही चांगला नाही. पेपर फुटल्याच्या घटना नेहमी घडल्यात. आता मी मागणी करतो की, हे सर्व पेपर अमेरिकेत प्रिंट करा. कारण आपल्याकडे दोन तासात पेपर फुटतात”, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हेही वाचा : पाच दिवसांत नुकसानभरपाई द्या ; शेतकऱ्यांना मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

“नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे. ही एजन्सी खासगी आहे. मग तुम्ही सर्व मेडिकल कॉलेज कुणाला देता तर एका खासगी संस्थेला. खासगी संस्था पैसे घेऊन काहीही करू शकते. या परीक्षेसाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र, त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करत आहे. याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. आतापर्यंत संबधित मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. तुमच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तर तुम्ही काय करणार?”, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

अजित पवारांनी राजीनामा द्यावा…

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “शिक्षणाची एवढी वाईट अवस्था या देशात ७० वर्षात कधीच झाली नव्हती. कोणत्याही परीक्षेत तुम्ही जर गुणवत्ता तपासणार नसाल तर या देशाचं भवितव्य अंधारात असेल. मात्र, या सरकारला काहीही देणंघेण नाही. अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेत सांगितलं की, नीटचे जे विद्यार्थी पुण्यात आणि मुंबईत आहेत, त्यांची भेट घेणार आहे. आता भेट कसली घेता? तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात, तुमच्या मित्रपक्षाचे केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा. किंवा तुम्ही राजीनामा द्या. त्यांना सांगा की मला हे सर्व पटत नाही. असं विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळू नका. मात्र, हे सांगतात की, मी विद्यार्थ्यांना भेटतो. मग हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा द्या”, असं थेट आव्हान जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिलं.