Jitendra Awhad Handcuffs : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांनी मोठ्या संख्येने विधीमंडळात दाखल होत आहेत. दरम्यान, या अधिवेशनासाठी विधीमंडळ परिसरात दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण, आव्हाड हातात बेड्या अडकवून विधीमंडळ परिसरात दाखल झाले होते. आव्हाडांचा असा अवतार पाहून सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना या बेड्यांचं कारण विचारलं. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय, व्यक्त होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जातायत, ती पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्त होता आलंच पाहिजे. बोलणे, व्यक्त होणे हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. आम्हाला व्यक्त होता येत नाहीये म्हणून मी या बेड्या अडकवून आलो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अमेरिकेत भारतीयांवर अन्याय होत आहे. व्हिसाच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेले धोरण अनेक भारतीयांचं घर व संसार उद्ध्वस्त करणारं आहे. ज्या पद्धतीने भारतीयांना एक-दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं, त्यांच्या पायात साखळदंड व हातात बेड्या अडकवल्या होत्या ते पाहून वाईट वाटलं. त्या विमानात शौचालयाची व्यवस्था देखील नव्हती. उपाशी पोटी त्यांनी प्रवास केला. भारतीयांना अशा प्रकारे अपमानित केलं गेलं. हा भारतीयांना हिनवणारा व अपमानित करणारा प्रकार होता. आपल्या महाराष्ट्रातील अनेकजण या पेचात अडकले आहेत. अनेकांची मुलं अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न पाहात होती. ती स्वप्नं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे भारतीयांच्या हाता-पायातील बेड्यांबाबत आपण बोलणार नसू तर ते राष्ट्रासाठी घातक आहे”.

अमेरिका आपली बाप नाही : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार म्हणाले, “भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण बोलणार नसू, आवाज उठवणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. हीच गोष्ट प्रातिनिधिक स्वरुपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी या बेड्या अडकवून इथे आलो आहे. मला आपल्या जनतेला सांगायचं आहे की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भेगतायत. त्यांच्यावर किती अत्याचार होत आहेत हे सांगण्यासाठी मी माझ्या हातात बेड्या अडकवल्या आहेत. कारण आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला सर्वांना एकच सांगायचं आहे की अमेरिकेविरोधात आवाज उठवा. अमेरिकेला घाबरण्याची गरज नाही. अमेरिका आपली बाप नाही”.