राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या काही दिवसांपासून ‘टू द पॉईंट’ या पॉडकास्ट कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. पहिल्या भागात त्यांनी जयंत पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमधून जयंत पाटील यांनी अजित पवार गट आणि भाजपावर शरसंधान साधले होते. आता दुसऱ्या भागात जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीची एक झलक नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये साधारण मुलाखतीमध्ये काय काय असेल, याचा अंदाज येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलेली दिसते. छगन भुजबळ यांना तर त्यांनी पोपट म्हणून संबोधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अजित पवारांनी निर्माण केलेली दहशत आणि दरारा याचा त्यावेळेस मी बळी पडलो. एकिकडे अजित पवार यांच्याकडून त्रास दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून होणारी अडवणूक यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणजे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात वाईट अवस्था माझी होती”, अशी खंत आव्हाड यांनी बोलून दाखविली.

हे वाचा >> “जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला”, शिंदे गटाच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शरद पवार आणि अजित पवार अशी दोन गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाल्यानंतर अजित पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले होते. अजित पवारांचा शपथविधी झाल्यापासून दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झालेले आहे. अमोल कोल्हे यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आक्रमक शैलीत जोरदार टीका केली. त्यांचे काही संवाद मुलाखतीच्या टिझरमध्ये दाखविले गेले आहेत.

हे ही वाचा >> नाना पाटेकर यांच्याविरोधात खडकवासलामधून लढणार का? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “प्रतिस्पर्धी असले तरी…”

“बाहेरच्यांनी द्रोह केला तर तो निपटून काढता येतो. घरातल्या द्रोहाचं करायचं काय? ज्यांनी साहेबांच्या राजकारणाला संपविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी वाटाघाटी होऊच शकत नाही. दिल्लीला शरद पवार जेव्हा एकटे बसत असतील तेव्हा ते विचार करत असतील की, मी कुठे कमी पडलो, यांना (अजित पवार गट) काय द्यायचे बाकी होते. पाण्यात पोहणारा मासा आपल्याला रडताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही, ते बोलून दाखवत नाहीत, म्हणजे त्यांना दुःख होत नाही, असे वाटतं का तुम्हाला?” अशा शब्दात आव्हाड यांनी खंत व्यक्त केली.

आव्हाड पुढे म्हणाले, “तुमचं कर्तुत्व महान आहे, असं तुम्हाला वाटतं ना. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे आहे, असं तुमचं म्हणणं आहे. मग घ्या ना स्वतंत्र निशाणी, स्वतंत्र पक्षाचं नाव आणि मग जनतेसमोर जा. जनता ठरवेल काय ते. ज्या घराने तुम्हाला सहा पदे दिली, नाव, ऐश्वर्य सन्मान दिला. त्या घराला पाडताना, त्यावर हातोडा मारताना तुम्हाला काहीच वाटले नाही. तुमच्याकडून काय अपेक्षा बाळगायच्या?”

“छगन भुजबळ पोपट”

राज्यातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, स्पर्धा परिक्षांता घोळ या सर्व गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांना सुपारी दिली आहे. भुजबळ स्वतःहून बोलत नाहीच, भुजबळ पोपट झालेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी मुलाखतीत केला.

‘टू द पॉईंट’ पॉडकास्टचा आव्हाड यांचा ‘एपिसोड २’ हा ५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रसारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबूकवर प्रसारित केला जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad express his pain while speaking with mp amol kolhe in podcast kvg
Show comments