जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात गेला होता. असं वक्तव्य केलं होतं. त्यावर ते आजही ठाम आहेत. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आमचा राम जात-पात न मानणारा आहे, शबरीची बोरं खाणारा आहे, जे राम-राम करत आहेत त्यांना मी सांगेन की तुमचा राम तुम्हाला निवडणुकीसाठी बाजारात आणायचा आहे, आमचा राम आमच्या जन्मापासून आमच्या हृदयात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी आपण काहीही चुकीचं बोललो नाही असंही म्हटलं आहे.
मी इतिहासाचा विपर्यास केलेला नाही
“मी महाराष्ट्राला अनेकदा संबोधित करत असतो. मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. विकृतीकरण माझं काम नाही. मी जे काही बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, विठ्ठल सगळी एकच रुपं आहेत. मी श्रीरामांबद्दल बोललो की ते मांसाहरी होते. जे याविरोधात बोलत आहेत त्यांच्या माहितीसाठी वाल्मिकी रामायणात अयोध्याकाण्ड आहे. त्यात एका श्लोकाचा संदर्भ आहे. तो मला वाचायचा नाही. मात्र तो उपलब्ध आहे तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही तो वाचू शकता असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटलं आहे. मी ते वाचत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही.”
१८९१ मधला संदर्भ मी वाचत नाही
“१८९१ मधलं एक डॉक्युमेंट आहे. मी त्यातलाही संदर्भही वाचत नाही. कारण मला त्याविषयी काहीही बोलायचं नाही. मला भारतातल्या आयआयटीतल्या पोरांनी अनेक पेपर्स पाठवले, तेदेखील उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता असं जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांना सांगितलं. ममता नाथदत्त, आयआयटी कानपूर, गीता प्रेस, हरिप्रसाद शास्त्री यांनी जी भाषांतरं केली आहेत ती उपलब्ध आहेत. इतिहासातल्या स्तोत्रांचा आधार घेऊन ही भाषांतरं करण्यात आली आहेत आहेत. वाल्मिकी रामायणात जर उल्लेख असेल त्यावर आक्षेप असेल तर त्यावर कुणाला बोलायचं असेल तर बोलावं. जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो कुणावर करावा लागेल ते जरा समजून घ्या” असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
अन्नपुराणी नावाचा सिनेमा आला आहे, त्यातला उल्लेख तपासा
“‘अन्नपुराणी’ नावाचा सिनेमा आला आहे. त्या सिनेमात त्यांनी वाल्मिकी रामायणातला श्लोक म्हणून दाखवला आहे आणि त्याचा संदर्भासह अर्थही सांगितला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. गुन्हे दाखल करायला काही हरकत नाही मी त्यांना घाबरत नाही.”
महंत सुधीरदास यांच्या कहाण्या सांगण्यासारख्या
नाशिकचे कोण साधूसंत आहेत? महंत सुधीरदास आहेत का? त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक की पौराणिक पूजा करायची त्यात अडकवलं होतं. त्यांच्या बऱ्याच कहाण्या आहेत सांगण्यासारख्या पण मी शांत राहतो. ज्यांच्या डोक्यात आजही वर्ण व्यवस्था बसली आहे त्यांच्याविषयी मी काय बोलणार? मी खेद व्यक्त केला आहे, याचाच अर्थ मला दुःख झालं आहे असंही आव्हाड म्हणाले आहेत.