राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीत सामील होण्यासाठी शरद पवारांची समजूत काढली जात आहे. भाजपाने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड पत्रकारांवर संतापले. शरद पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला. शरद पवारांनी अजून कितीवेळा भूमिका स्पष्ट करावी, पत्रकारांना नेमकं काय अपेक्षित आहे. मी आहे तिथेच आहे, असं शरद पवारांनी दररोज येऊन सांगावं का? अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा
यावेळी शरद पवारांच्या भूमिकेबाबत विचारताच जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांनी अजून कितीवेळा भूमिका स्पष्ट करावी. पत्रकारांना नेमकं काय अपेक्षित आहे. मी आहे तिथेच आहे… मी आहे तिथेच आहे… असं त्यांनी दररोज तुम्हाला सांगावं का? त्यांनी सांगोल्यात आपली भूमिका एकदा स्पष्ट केली आहे. मी कुठेही जाणार नाही. मी माझ्या विचारधारेच्या विरोधात काम करणार नाही. मी कुठल्याही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.”
हेही वाचा- “निवडणुका आल्या की प्रत्येक पक्ष सर्वच जागांवर दावा सांगतो”, रोहित पवारांचं वक्तव्य
“तरीही तुम्ही पत्रकार आणि इतर काहीजण मुद्दामहून असे प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करत आहात. आमच्या साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती जर तुम्हाला समजत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे”, असंही जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले.