गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चर्चेच्या केंद्रस्थानी ठरले आहेत. याला सुरुवात झाली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यादरम्यान शरद पवारांवर केलेल्या टीकेपासून. शरद पवारांमुळे राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं, असा दावा राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर मनसे, भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर शरद पवारांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना उद्देशून करण्यात आलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.
काय आहे स्क्रीनशॉटमध्ये?
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये शरद पवारांचं नाव न घेता त्यांना इशारा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या ‘गांधी’साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असं ट्वीट लिहिल्याचं दिसून येत आहे. ‘बागलाणकर’ नावाच्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं. या ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाडांचं संतप्त ट्वीट!
या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “काय पातळीवर हे सगळं होत आहे. या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा”, असं आपल्या ट्वीटमध्ये आव्हाडांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलीस, ठाणे पोलीस यांना टॅग केलं आहे.
सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याचं प्रमाण वाढू लागलेलं असताना या प्रकरणावर पोलीस कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.