लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते आणि ते मांसाहार करायचे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी प्राचीन ग्रंथ वाचून हे विधान केले असावे. त्यावर आपण काही बोलू शकत नाही, असे सांगत आव्हाड यांच्या विधानाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले.
सोलापुरात प्रसार माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना शिंदे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराची होणारी प्राणप्रतिष्ठा, त्यावरून देशात निर्माण होणारे वातावरण, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीची रणनीती, पत्रकारितेचे भवितव्य आदी मुद्यांवर भाष्य केले.
ते म्हणाले, अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना तो निव्वळ धार्मिक विधी आहे. त्याला पक्षीय राजकारणाचे स्वरूप येता कामा नये. प्रभू रामचंद्र केवळ हिंदू धर्मियांचे नाहीत तर मुस्लीमांसह संपूर्ण देशाचे आहेत. राम मंदिर केवळ धार्मिक असताना त्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा-“आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, “त्यांनी…”
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीने रणनीती बनवत असताना त्यात आपला सहभाग नाही. मात्र देशाला कोणी जास्त काळ फसवू शकत नाही. त्यातून इंडिया आघाडीला रणनीती आखताना प्रसंगी पराभव झाला तरी सोनिया गांधी पळून न जाता पुन्हा कणखरपणे नेतृत्व करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. अलिकडे व्यवस्थेला प्रश्न विचारणा-या पत्रकारांचे फोन हॕक केले जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याबद्दल शिंदे म्हणाले, सध्याच्या काळात लोकशाही अडचणीत येत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न होत आहे. हा धोका केवळ पत्रकारच ओळखून नाही तर सामान्य जनतेला त्याची जाणीव होत आहे. तेव्हा शेवटी जनता परिस्थिती हातात घेऊन त्यात सुधारणा घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.