प्रभू राम हे मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्यात केलं. त्यामुळे महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विविध पद्धतीने निषेध आंदोलन केलं जातं आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात नाशिकमधल्या साधूंनी आणि महंतांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांचे आता शिशुपालाप्रमाणे १०० अपराध भरल्याचंही महंत सुधीरदास पूजारी यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड यांच्या रामाविषयीच्या वक्तव्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असं नाशिकच्या साधू-महंतांनी म्हटलं आहे. तसंच आता हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांचे शंभर अपराध भरले आहेत असंही वक्तव्य केलं आहे. जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाशिकमधील साधू महंतांनी केली आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज साधू महंतांनी दिला आहे. या अर्जावर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

काय म्हणाले महंत सुधीरदास?

आज आम्ही पंचवटी पोलीस ठाण्यात संत-महात्म्यांच्या सहीने अर्ज दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही केली आहे. FIR दाखल करण्यात आला आहे. आम्ही अॅडव्होकेट भिडे यांच्या माध्यमातून कोर्टातही अर्ज दाखल करणार आहोत. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरुन ज्या पद्धतीचं वक्तव्य वारंवार करत आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत अशी वक्तव्य होतात. त्यामुळे ईशनिंदा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने करावा अशी आमची मागणी आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत आम्ही त्यांनाही निवेदन देणार आहोत. असा कायदा झाला तर हिंदू देव-देवतांची टिंगलटवाळी थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल. जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करावी अशीही मागणी आम्ही केली आहे असं महंत सुधीरदास यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचे १०० अपराध भरले

“जितेंद्र आव्हाड जे म्हणाले की भाषणाच्या ओघात बोलून गेलो, भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पश्चात बुद्धी आहे. आमचं असं म्हणणं आहे जर हे आज बोलत असतील तर काल ते नशा करुन बोलत होते का? जर अशा पद्धतीने बोलत होते तर काल नशा केली होती का आव्हाडांनी? त्यांचा असाच लौकिक आहे ठाण्यात हे आम्हाला समजलं आहे. हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. शिशुपालाप्रमाणेच जितेंद्र आव्हाडांचेही १०० अपराध भरले आहेत.”

जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.