Jitendra Awhad on Markadwadi Protest Against EVM : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहेत. काँग्रेसने ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या लाँग मार्चची सुरुवात मारकडवाडीतून होणार असल्याची चर्चा होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार उत्तम जानकर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शुक्रवारी (६ डिसेंबर) जानकरांनी प्रसारमाध्यमांसमोर यावर भाष्य केलं. पाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनी देखील एक्सवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती राज्यभरात खदखदत असणाऱ्या ईव्हीएमविरोधी असंतोषाला अजूनच चालना देणारा ठरेल यात वाद नाही. परिणामी संपूर्ण राज्यात ‘मारकडवाडी पॅटर्न’ राबवायला सुरुवात होईल, याची मला खात्री आहे. येत्या रविवारी (८ डिसेंबर) शरद पवार मारकडवाडीला भेट देणार आहेत. राहुल गांधी देखील ईव्हीएमविरोधात लाँगमार्च मारकडवाडी येथूनच काढणार आहेत. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ही ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार होवो!”
हे ही वाचा >> अजित पवारांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त! ठाकरेंची शिवसेना म्हणाली, “लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश”
मारकडवाडीतील लोकांचं आंदोलन राजव्यापी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न
गेल्या महिन्यात २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळालं आहे. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. ६४ वर्षांच्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला मिळालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य महायुतीला मिळालं आहे. हा निकाल पाहून राज्यभरातून निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त होऊ लागला आहे. विरोधकांनी देखील ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदानाला विरोध केला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावच्या ग्रामस्थांनी देखील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याचं ठरवलं होतं. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ३ डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नियोजन केलं होतं. मात्र, प्रशासनाने ही योजना उधळून लावली. मारकडवाडीत संचारबंदी लागू केली आहे. काहीही झालं तरी मतपत्रिकेवर मतदान घेणार अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाने गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “४०० उंबऱ्यांच्या गावात ३०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत”. प्रशासन या मतदानाला इतका विरोध का करतंय असा प्रश्न देखील सामान्य जनतेतून व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.