महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसून येत आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी जागावाटप, पक्षांतर्गत बैठका, संभाव्य उमेदवार यावर चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी सरकारकडून निवडणुकांच्या आधी जाहीर केल्या जाणाऱ्या योजनांचीही चर्चा दिसून येत आहे. एकीकडे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आता लाडका भाऊ योजनेत तरुणांना थेट आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी नितीन गडकरींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यातून सरकारला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वंसंध्येला नव्या योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असून त्यानुसार तरुणांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यात १२वी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना दरमहा १० हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. पंढरपूरमधील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.

mahayuti eknath shunde devendra fadanvis ajit pawar
मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Devendra Fadnavis Challenge to Sharad Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा..”
sushma andhare replied to devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीस हेच ‘फेक नरेटिव्ह’चं महानिर्मिती केंद्र”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…
national icon Ratan Tata
रतन टाटा यांना भावपूर्ण निरोप, अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांची रीघ
pm narendra modi slams maha vikas aghadi in thane
Narendra Modi In Thane : महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde, metro project, Eknath Shinde on metro,
चौकशी लावली असती तर मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांचा आक्षेप, टीका

दरम्यान, अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर आता लाडका भाऊ योजनाही जाहीर केल्यामुळे विरोधकांनी यावर टीका केली आहे. निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून या घोषणा केल्या जात असून जनतेनं ते लक्षात घ्यावं, असं आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर राज्य सरकारला खोचक टोलाही लगावला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेला नितीन गडकरींचा व्हिडीओ हा त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमधला आहे. यात नितीन गडकरी सरकारी पैशातून वाटल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

“या देशातली वीज मंडळं १८ लाख कोटींच्या तोट्यात आहेत. जर आपल्या देशातील सरकारांमध्ये अशाच प्रकारे वीज मोफत देण्याची स्पर्धा राहिली, तर देशातलं वीज उत्पादन संपून जाईल. आपल्या देशात असं मिक्सर वाटणं, इडली पात्र वाटणं, इडल्या वाटणं वगैरे होताना दिसत आहे”, असं नितीन गडकरी या व्हिडीओत सांगत आहेत.

“फुकटच्या गोष्टींमुळे देशाचं नुकसान होईल”

“फुकटच्या गोष्टी सरकारच्या पैशातून वाटल्यामुळे राजकारण होत नाही. आपण रोजगार निर्माण करायला हवा. गरिबांना घरं बनवून द्यायला हवीत. स्वच्छ भारत निर्माण करायला हवा. देश कचरामुक्त करायला हवा. नवे उद्योग आणायला हवेत. लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. देशाच्या विकासासाठीचे हे शाश्वत उपाय आपण करायला हवेत. निवडणुका जिंकण्यासाठी फक्त रेवडी वाटल्यामुळे देशाचं नुकसान होईल, अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल व समाजाचंही नुकसान होईल”, असं परखड मत नितीन गडकरींनी या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

Ladka Bhau Yojana : लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

“फुकटच्या गोष्टी जेव्हा लोकांना दिल्या जातात, तेव्हा लोकांना त्यांचं महत्त्व राहात नाही. लोकांना नक्कीच जिथे गरज असेल तिथे सुविधा दिल्या पाहिजेत. पण निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हे जे काही राजकारण चालू आहे, ते लोकशाहीसाठी घातक आहे. ते योग्य नाही”, अशी स्पष्ट भूमिका नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा टोला!

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडीओ शेअर करताना खोचक पोस्ट लिहिली आहे. “घरचा आहेर. कटू आहे पण सत्य आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना लागू करणे म्हणजे राज्याचे नुकसान करणे असं गडकरी साहेब म्हणत आहेत”, असं जितेंद्र आव्हाड या पोस्टमध्ये म्हणत आहेत.