संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतंच पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत हे आरोप केले.
हेही वाचा- “अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान
संबंधित ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरू केली. ‘जाणता राजा’ हे महानाट्य त्याचं एक रुप आहे. कारण त्यांचं हे लिखित पुस्तक होतं. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीतील काहीजण पुढे नेत आहेत. अशा गोष्टींना आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे यांच्या रुपाने एक आवाज मिळाला आहे.”
संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,” असं संभाजीराजे म्हणाले.
“इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करुन असले चित्रपट काढत आहात,” असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला.