Jitendra Awhad On Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत, त्यांना करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्यानिषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते यांनी बीडमधील जाती-पातीच्या राजकारणावर भाष्य केले आहे.
“प्रत्येकाच्या भाषणामध्ये जातीचा उल्लेख होत आहे, आपण या भिंती कधी तोडणार आहोत, संतोष देशमुख स्वत:च्या जातीसाठी नाही मेला, संतोष देशमुख बीडचा चेहरा बनला आहे, बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे कधीकधी समाजवादी विचारांचे लोक निवडून आले होते. अशा वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या जातींच्या लोकांनी प्रतिनिधीत्व केलं”, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, “लोक मला फोन करतात की, तुम्ही वंजाऱ्यांविरोधात बोलताय… माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? मी एका माणसासाठी लढतोय. बीडचा खरा चेहरा ज्याच्यामध्ये दिसतोय. तो स्वत:च्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेटवर, एका दलित व्यक्तीला मारहाण झाली आणि त्या दलित व्यक्तीने संतोष देशमुख यांना हाक दिली आणि म्हणून संतोष तेथे गेला. हा बीडचा चेहरा आहे”.
“सुरेश धस यांनी नावे घेतली ते मर्डर झालेले त्यांची नावे काय होती? आंधळे, राख , फड हे कोण आहेत? सगळे वंजारी आहेत ना? मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी. बापू आंधळे मर्डर केसमध्ये बबन गितेचा काय संबंध होता? बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथले पोलीस प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी”, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती ः आव्हाड
“पोलीस प्रशासनाकडून वेळीच कारवाई झाली असती तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती असेही आव्हाड म्हणाले आहेत. “जर अशोक सोनवणे याची अॅट्रॉसिटी केस दाखल झाली असती आणि त्यांना त्याच दिवशी अटक झाली असती तर संतोष मेलाच नसता”, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
“मटका दारू, सगळे धंदे यांचे आहेत, मी सभागृहातही बोललो होतो आणि आताही सांगतो आका-बिका काही नाही, आकाचा बाप कोण आहे? सगळ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे ते, मग त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला ? त्याला मंत्रिमंडळातून पहिल्यांदा हकला”, अशी मागणीही आव्हाडांनी यावेळी केली.
हेही वाचा >> “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा…
तर मी वंजारी नाही…
“मला सगळ्यांना सांगायचं आहे. मी जातीने वंजारी उभा आहे. पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आणि मी जर शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. वंजरी हा कष्टकरी समाज अन्याय सहन करणारा नाही. माझा बाप २२ वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरीबी, उसतोड वगैरे आम्हाला सांगाया जाऊ नका. मी एक हमालाचा नातू आहे. १८ विश्व दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची हिम्मत तिथूनच आली”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.