मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन, असं विधान उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.
मुंबईत जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. चांगल्या गोष्टीला आमचे समर्थन असते,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : मढमधील अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार, सोमय्यांची अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले…
“रोशनी शिंदेने समाजमाध्यमांवर अश्लील आणि असभ्य असे काही लिहिले नव्हते. मग तिला मारण्याचे कारण काय होते? तिला आई होण्यापासून रोखणे हे सर्वात मोठे पाप आहे. तिला पोस्ट डिलीट मारण्यास सांगायला हवी होती. मात्र, तिच्या इमारतीजवळ जाण्याची काय गरज होती,” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर; टीझर प्रदर्शित
“पत्रकाराला बाहेर फिरू नको, तुला लोक शोधत आहेत, असा दम दिला जातो. स्मिता अंग्रे नावाच्या तरुणीलाही दम देण्यात आला आहे. महाराष्ट्रात चार रॅपरचा पोलीस शोध घेत आहेत. आता नामदेव ढसाळ असते, तर त्यांनाही आर्थर रोड जेलमध्ये बंद केले असते. नामदेव ढसाळ हे बंडखोर होते. परिस्थिती माणसाला बंडखोर करते. आणि बंडखोरी कविता आणि शब्दांतून व्यक्त करतात. हा त्यांचा गुन्हा आहे का?,” असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.