कंत्राटी नोकरभरतीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कंत्राटी नोकरभरती करण्याचा जीआर मागे घेत असल्याची घोषणा केली. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारचं असल्याची टीका फडणवीसांनी यावेळी केली. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हणाले, “काल सत्ताधारी पक्षाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी, त्यांना लाज वाटली पाहिजे, खोटी माहिती पसरवतात, अशा पद्धतीचे विधान त्यांनी केलं. ज्या शासन निर्णयाचा ते उल्लेख करत होते; तेव्हा ते स्वतः मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या सहकारी गटाचे ते नाव घेतात तेही मंत्रिमंडळात होते. संबंधित जाहिरातीत क आणि ड गटांचा समावेश होता आणि त्या शासन निर्णयाची कधी अंमलबजावणीच झाली नाही.”
हेही वाचा- कंत्राटी भरतीचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी जी.आर. कोणी काढला? अनिल देशमुखांचा सवाल
“आपण जी पदे काढण्याचा प्रयत्न केला, ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ही पदे अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसूल खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांच्या कामाशी त्यांचा संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकारही असतात. ही पदे MPSC मार्फत भरली जातात. ती पदे आपण कंत्राटी पद्धतीने भरणार होतात. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर जाहिरातदेखील काढली होती. त्यांनी खुलेआम पत्रकारांना सांगितलं होतं की, मला वरून निरोप आला होता,” असं जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
हेही वाचा- देश, संस्कार संपवायला निघालेल्या ठाकरेंना जनता धडा शिकवेन – चंद्रशेखर बावनकुळे
बावनकुळेंना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये आमदार आव्हाड पुढे म्हणाले, “पहिल्या शासन निर्णयामध्ये आपणही मंत्री म्हणून समाविष्ट होतात आणि दुसऱ्या शासन निर्णयामध्येदेखील मंत्री म्हणून आपण समाविष्ट होतात. MPSC ची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, हा गैरसमज नाही. तर आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या, एवढं वाईट वाटून घेऊ नका. लोक शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला फार हुशार समजत असू तरी लोकांनाही खूप काही कळत असतं.”
“तुम्ही काढलेल्या त्या शासन निर्णयाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रचंड विरोध केला. हे कुठल्याही एका पक्षाचे यश नाही. महाराष्ट्रातील तरुणांचे हे यश आहे. या तरुणांनी उभं राहण्याचं जे धाडस दाखवलं. आपण कुठल्या प्रकारे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतात, हे त्यांच्या लक्षात आलं. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना लाज वाटली नाही का? असं म्हणणारा हा मंत्री उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री होता आणि बाकीचे ८ जण हे सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लाज काढण्याइतपत आपण मोठे झालात का? करारा जवाब मिलेगा…” असंही आव्हाड पोस्टमध्ये म्हणाले.