राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांनीही अजित पवारांना समर्थन दिलं. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्यं केली. यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात,” अशी टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली. वळसे पाटलांच्या या टीकेला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा माणूस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचा- “शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही”, दिलीप वळसे-पाटलांचा थेट हल्लाबोल; म्हणाले…

जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले की, “वळसे-पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि शरद पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांच्या नजरेनं या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजुच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही.”

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट…

“वळसे-पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटलं. अनेकांना सर्व काही देऊनही शरद पवार मात्र कायमच रीते राहिले. बरं झालं शरद पवारांविषयी यांच्या मनातील विष बाहेर पडत आहे. हे महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव त्यांना नक्की धडा शिकवेल”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on dilip walase patil statement about sharad pawar not become cm with majority rmm