Girl Raped in Swargate Bus Stand Pune : पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बलात्काराच्या घटनेवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. “शांत……… सरकार झोपले आहे,” असे म्हणत या पोस्टमधून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाडांनी त्यांच्या पोस्टमध्ये आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पीडित मुलीला झालेला प्रकार कुणाला तरी सांगावा वाटला नाही यात समाज म्हणून आपल्या सर्वांचा पराभव आहे असेही आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट…

“राज्यातील पोलीस प्रशासनाची संवेदनशीलता आणि महिलांची सुरक्षितता रसातळाला गेल्याची परिस्थिती आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेला कित्येक तास उलटून गेले तरी आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याउलट पोलीस प्रशासन पीडित तरुणीलाच दोष देण्याचं काम करत आहे. घडलेल्या प्रसंगानंतर तरुणीची मानसिक स्थिती काय असेल याची एकुलत्या एका मुलीचा बाप म्हणून कल्पनाही करवत नाही. झाला प्रकार या तरुणीला लगेच कुणाला तरी सांगावा वाटला नाही यात आपल्या सर्वांचा समाज म्हणून मोठा पराभव आहे. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिला असुरक्षित आहेत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने महिला सुरक्षेचे अनेक प्रश्न उभे राहतात,” असे म्हणत आव्हाडांनी स्वारगेट बस स्थानकातील प्रशासकिय व्यवस्थेबद्दलच्या काही समस्या मांडल्या आहेत.

1) स्वारगेटचे नेहमीचे प्रवासी सांगतात की, स्वारगेट बस स्थानकात रात्री पुरेसा प्रकाश नसतो.
2) बस गाड्या नियोजित फलाटावर लागत नाहीत.
3) आगार व्यवस्थापक चौकशीसाठी येणाऱ्या प्रवाशांना व्यवस्थित माहिती देत नाहीत.
4) रात्री मुक्कामी असणारी बस लॉक का नव्हती?
5) घटनास्थळापासून स्वारगेट पोलीस स्टेशन अवघ्या हाकेच्या अंतरावर असूनही तिथे पोलीस रात्रभर गस्त का घालू शकत नाहीत?

पुढे बोलताना आव्हाडांनी राज्याचे मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली आहे. “मुळात एखादा गुन्हा घडल्यानंतर पीडित व्यक्तीला पोलिसांकडे जाण्याची भीती वाटत असेल, तर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत ही एक अफवाच उरते. मुख्यमंत्री असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांसाठीही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलिसांकरवी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्यापेक्षा पोलीस खात्यातील आणि राज्य परिवहन महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी माझी मागणी आहे,” असेही आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.