आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी अजब विधान केलं आहे. लोकांचं मांसाहर करण्याचं प्रमाण वाढल्याने हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, असा दावा बेहरा यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी मांसाहर न करण्याची शपथ घ्या, असं आवाहन केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी अवघ्या तीन शब्दांत प्रतिक्रिया देत आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांना टोला लगावला. “ही वेड्याची पैदास”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं. त्यांचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.
लक्ष्मीधर बेहरा नेमकं काय म्हणाले?
“आपण हिमाचल प्रदेशात राहतो, जर इथले लोक मांसाहार करत राहिले तर हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या आणखी घटना घडतील. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंध आहे. तुम्ही ते पाहू शकत नाही पण तो परिणाम होतोच.” असं बेहरा म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा- लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी, IIT मंडीच्या संचालकांचा अजब दावा!
हिमाचल प्रदेशात वारंवार होणारं भूस्खलन, ढगफुटी आणि इतर ज्या नैसर्गिक समस्या येत आहेत ते सगळे प्राण्यांवरच्या क्रूरतेचे परिणाम आहेत. लोक मांसाहार करतात, त्यामुळे अशा समस्या ओढवतात. चांगला माणूस होण्यासाठी लोकांनी मांस खाणे बंद करायला हवं असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असंही आवाहन केलं.