सोमवारपासून (१९ डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात खडाजंगी पाहायला मिळाली. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांनी नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गदारोळ झाला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू देत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना सभागृहात बोलू न दिल्याने जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं. ‘तुम्ही असला निर्लज्जपणा करू नका,’ अशा शब्दांत जयंत पाटलांनी अध्यक्षांवर टीका केली. यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी केल्याने जयंत पाटलांना हे अधिवेशन संपेपर्यत निलंबित करण्यात आलं.

हेही वाचा- “आज तुमच्याकडे फक्त पद आहे, दुसरी माणसं नव्हती म्हणून…”; राज ठाकरेंचं नागपुरात विधान

या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “जयंत पाटलांनी काहीही चुकीचं बोललं नाही. निर्लज्ज ही काही शिवी नाही. लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज म्हणतात, त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय. पण मला अध्यक्षांनी एकदाही बोलू दिलं नाही. आम्ही मुद्यांवर बोलतोय. एनआयटीचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. हा भ्रष्टाचार तुम्ही दडपणार असाल, तर कसं चालेल? हा तुम्ही केलेला भ्रष्टाचार आहे,” अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंना उद्देशून जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “तुम्ही उच्च न्यायालयात कबुली दिली आहे. मला सचिवांनी कळवलं नाही, म्हणून मी त्या कागदावर सही केली, असं कारण तुम्ही न्यायालयात दिलं. म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयात गुन्हा कबुल केला आहे. गुन्हा कबुल करणे म्हणजे निर्दोष आहे, असं नाही. स्वत:च्या हुशारीवर महाराष्ट्र चालवण्याची ज्याच्यात ताकद आहे, तोच खरा मुख्यमंत्री असतो,” असंही आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on jayant patil statement on vidhansabha speaker rahul narvekar nirlajja comment rmm
Show comments