हरियाणातील नूह जिल्ह्यात ३१ जुलै रोजी मोठा हिंसाचार उफाळला. या घटनेचे पडसाद शेजारच्या अन्य राज्यांतही उमटले. हरियाणातील काही समुदायाने ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचारामुळे नूह जिल्ह्यासह अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने अनेक गाड्या आणि घरं पेटवली. काहींनी हातात बंदुका घेऊन दहशत पसरवली. या हिंसाचारामागे बिट्टू बजरंगी आणि मोनू मानेसर या दोन व्यक्ती असल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं. याप्रकरणी बिट्टू बजरंगी याला पोलिसांनी अटकही केली आहे.
या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी ओबीसी, दलित आणि मागासवर्गीय समाजातील युवकांना हिंसाचाराच्या घटनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या समाजातील लोक कट्टर हिंदू बनून धर्म वाचवायला बाहेर पडले तर भावी पिढ्यांना ‘धार्मिक झोंबी’ बनून उद्ध्वस्त व्हावं लागेल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “बिट्टू बजरंगीचं खरे नाव राजकुमार लोहार आहे. तर मोनू मानेसरचे खरं नाव मोहित यादव आहे. हे दोघेही ओबीसी समाजातील आहेत. आज कट्टर हिंदू झाले आहेत. ते धर्म वाचवायला बाहेर पडले आहेत. ते उन्माद पसरवतात, लिंचिंग करतात, दंगली भडकतील अशी कारस्थाने करतात. पण ओबीसी, दलित,मागासवर्गीय समजातील लोकांनी हा फरक आता तरी समजून घ्यायला हवा. नाहीतर ‘धार्मिक झोंबी’ बनून येणाऱ्या पिढ्यांना बरबाद व्हावं लागेल. हा फरक समजून घेण्याची वेळ अजूनही आहे.”