राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर याबाबतची सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात याचिका दाखल केली. पण त्यांनी शरद पवारांचं नाव वगळलं. शरद पवार आमचे दैवत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणतंही पाऊल उचलणार नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सुनील तटकरेसाहेब तुम्ही काल पुन्हा एकदा शरद पवारांना दैवत म्हणालात. ज्या दैवताला तुम्ही त्यांच्या घरातून बाहेर हुसकावण्याचं काम करताय. त्यांना दैवत म्हणून त्यांचा अपमान का करताय? ‘मुँह में राम और पेट में नथुराम’, अशी तुमची अवस्था आहे. शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे, मग ते तुमचे दैवत कसले? असं बेगडी प्रेम दाखवू नका. वैर घ्यायचं असेल तर समोरासमोर घ्या.”

हेही वाचा- “कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ…”, ‘त्या’ घटनेवरून काँग्रेसची टीका

“तुम्ही पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला नाहीत. तुम्ही खूप विचार करुन राष्ट्रवादीत आला आहात. याचा मी स्वत: प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अब्दुल रहमान आणि अंतुले यांनी तुम्हाला राजकीय जन्म दिला. पण तुम्ही त्यांनाही झोपवायला कमी केलं नाही. राजकारणात माणुसकी नसते, हे तुम्ही सिद्ध करुन दाखवलं,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

हेही वाचा- “होय, पंकजा मुंडेंवर अन्याय झालाय”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “ज्यांच्या वडिलांनी…”

सुनील तटकरेंना उद्देशून आव्हाड पुढे म्हणाले, “ज्या शरद पवारांनी तुम्हाला राज्यमंत्री केलं, अर्थमंत्र्याची जबाबदारी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं, त्या शरद पवारांना घराबाहेर काढताना आणि त्यांनी बाळ म्हणून सांभाळ केलेला पक्ष हिसकावून घेताना तुम्ही मागे-पुढे पाहत नाहीत. यावर काय बोलावं. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शरद पवारांना दैवत वगैरे म्हणू नका. शरद पवार देव नाहीत, ते माणूसच आहेत. त्यांनाही हृदय आहे, त्यांनाही वेदना होतात. हे कदाचित तुम्हाला कळत नसेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on sunil tatkare statement about sharad pawar is our god rno news rmm