राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली ती २ जुलै २०२३ ला. त्यावेळी अजित पवार गटाकडून एक आरोप केला गेला होता. त्यात अजित पवारांनी तसंच प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळीच राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपासह जायचं मान्य केलं होतं. आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार होतं. ते पत्र कसं तयार झालं? त्यावेळी नेमकं काय झालं? शरद पवारांना एकटं टाकून भाजपासह जायचं असं ठरलं होतं असं आता जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसंच मी त्यावेळी अजित पवारांच्या दहशतीचा बळी ठरलो असंही त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांचा दरारा आणि दहशत याचा बळी ठरलो

“एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या. आमच्यातले काहीजण आधीच अस्वस्थ होते, सत्तेत जायचं आहे हे सांगायचे. दोन चार लोक असे होते की जे रोज शरद पवारांकडे जायचे आणि सांगायचे की आपण भाजपासह जाऊ. एक वेळ अशी आली की काही लोक म्हणू लागले शरद पवारांना एकटं राहू द्या आपण भाजपाबरोबर जाऊ. हे सुरु असताना एक माणूस ढसाढसा रडला. त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील. मग त्यांनी सांगितलं की आपण एक पत्र लिहू ते शरद पवार यांना दाखवू. त्यावेळी काही टपलेले लोक म्हणाले की जितेंद्रला विचारा, तेव्हा मी म्हटलं हो सही करायला तयार आहे जर शरद पवारांनी सांगितलं तर तो निर्णय मान्य. अजित पवारांनी निर्माण केलेला दरारा आणि दहशत याचा त्यावेळी मी बळी ठरलो. ” असं आव्हाड म्हणाले.

जयंत पाटील यांनी ते पत्र..

“अजित पवारांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं मला त्या काळात. पण आज महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटील यांनी आपल्या खिशात ठेवून घरी नेलं त्यांनी आयुष्यात ते पत्र शरद पवारांपर्यंत पोहचवलंच नाही. शरद पवारांना एकटं सोडून आपण भाजपाबरोबर जाणं हे मला पटत नाही असं ते मला म्हणाले. तसंच पत्र देत नाही असंही म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हटलं सर्वात आधी काय कराल तर माझं नाव त्यातून काढा. त्यावेळी अजून एक माणूस होता ज्याचं नाव होतं प्राजक्त तनपुरे. त्यानेही मला सांगितलं जमणार नाही मी त्याला सांगितलं की तू जा. त्यावेळीही अशी माणसंही होती ज्यांना भाजपासह जायचं नाही. मी पण त्यावेळी त्या विचारांशी समझोता करायचा नाही हा निर्णय घेऊनच बसलो होतो.” असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हे पण वाचा- “फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मांडणारा माणूस अचानक गोळवलकरांच्या मांडीवर..,” जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

मी शरद पवारांशी प्रतारणा करु शकत नाही

मला ज्या माणसाने बोटाला धरुन चालायला शिकवलं अशा शरद पवरांशी प्रतारणा करणं मला पटत नाही. अजित पवार गट फुटून बाहेर जाणं ही गद्दारीच आहे. हा शरद पवारांशी केलेला द्रोह आहे. छगन भुजबळांचा अपवाद सोडला तर कुणीही स्वयंम म्हणजे स्वबळावर निर्माण झालेला माणूस आहे का? शरद पवारांनीच या सगळ्यांना मोठं केलं. टू द पॉईंट या अमोल कोल्हेंच्या पॉडकास्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हे भाष्य केलं आहे.

मी अजित पवारांपासून चार हात लांबच राहायचो

शरद पवारांना महाराष्ट्रात त्यांच्या घरातूनच आव्हान दिलं जाऊ शकतं हे चित्र निर्माण केलं गेलं. २०१९ ला त्यांनी (अजित पवार) बंड केलं होतं तर मग ते परत का आले? त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही देखील चूकच झाली असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मी अजित पवारांपासून चार हात लांबच राहायचो. कारण चारचौघात अपमान केला तर काय होईल? पाचव्या मिनिटाला सगळ्या महाराष्ट्रात तो अपमान पोहचणार. त्यापेक्षा चार हात लांब राहिलेलं बरं. माझी आणि त्यांची ओळख १९८९ ची. पण २०२२ पर्यंत मी त्यांच्या फार जवळ जाऊन बोललोच नाही कारण मला त्यांची थोडी भीतीच वाटायची असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad opens up about ncp mlas letter of support to bjp said i was a victim of ajit pawars terror scj