राज्य सरकारकडून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येईल असं म्हटलं गेलं आहे. यावरुन सुरु झालेला वाद संपलेला नाही. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. तर हिंदू जनजागृती समितीनं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी संविधान नाकारण्यासाठी मनुस्मृती आणली जाते आहे असा आरोप केला. त्यानंतर त्यांनी आंदोलनही केली. आता जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. मनुस्मृती स्त्रियांबाबत काय विचार करते हे त्यात सांगण्यात आलं आहे. ज्या पोस्टची चर्चा होते आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’नं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र, यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. परंतु हा निर्णय सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या वादाचा ठरतो आहे असंच दिसतं आहे.
देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण काय?
मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे कधी करण्यात आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी (जितेंद्र आव्हाड) फाडला. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. असं असूनही जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा सोडलेला नाही. त्यांनी २४ तत्त्वं सांगत पोस्ट केली आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?
‘मनुस्मृती’ आणि महिला ! असा मथळा देत जगदिश काबरे यांनी संकलित केलेली २४ तत्वं जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केली आहेत. एक्स या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही तत्त्व पोस्ट करण्यात आली आहेत.
हे पण वाचा- “सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
काय आहेत ही तत्त्व?
१) “व्यभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृती, अध्याय ९वा. श्लोक १९)
२) “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, हे तिने कायम ध्यानात ठेवावे. [अध्याय ५/ श्लोक १५२]
३) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [ अध्याय ५/ श्लोक १५४]
४) “स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [अध्याय ९/ श्लोक१४]
५) “पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात.” [अध्याय ९/ श्लोक१५]
६) “नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.” [अध्याय ९/ श्लोक ४६]
७) “सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [अध्याय २/ श्लोक १३]
८) “माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [अध्याय २/ श्लोक १५]
९) “ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [अध्याय ३/ श्लोक ८]
१०) “जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [अध्याय ३/श्लोक ११]
११) “नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [ अध्याय ४/ श्लोक ४३]
१२) “आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका. बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही
स्वतंत्रपणे करू नये.” [ अध्याय ५/श्लोक ४७]१३)
१३) “स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [ अध्याय ५/ श्लोक४८]
१४) “पिता, पती, पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [अध्याय ५/ श्लोक ४९]
१५) “पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [अध्याय ५/श्लोक १५०]
१६) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [ अध्याय५/ श्लोक १५४]
१७) “पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [अध्याय५/श्लोक१५५]
१८) “स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [अध्याय५/ श्लोक १६२]
१९) “पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [अध्याय५/ श्लोक १६८]
२०) “स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [अध्याय५/श्लोक १६६]
२१) “पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे, सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [अध्याय६/ श्लोक२]
२२) “विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.’ [अध्याय६/ श्लोक ३]
२३) “स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [अध्याय९/ श्लोक १३]
२४) “स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [अध्याय९/ श्लोक १८]
अशा ‘मनुस्मृती’ नावाच्या पुस्तकातील श्लोक अभ्यासक्रमात लावणेबाबत शैक्षणिक आराखड्यात उल्लेख आहे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. यावर आता काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.